गोंदिया - तालुक्यातील छिपीया येथील ग्रामपंचायत भवनाची इमारत जीर्ण झाली आहे. त्यामुळे सध्या ही इमारत केव्हाही कोसळ्याण्याची शक्यता आहे. याबरोबरच पावसाळ्यात या इमारतीला गळती लागली आहे. तरीही जिल्हा परिषद व पंचायत समितीने या इमारतीची दखल घेतली नाही. त्यामुळे गावकऱ्यांमधून रोष व्यक्त होत आहे.
छिपीया येथील ग्रामपंचायत भवनचे बांधकाम 2004-05 मध्ये झाले आहे. या इमारतीच्या बांधकामाला 14 वर्षे पूर्ण झाली असून अल्पावधीतच इमारतीचे स्लॅब कोसळू लागले आहे. तर इमारतीला पावसाळ्यात अनेक ठिकाणी गळती लागत असल्याने ग्रामपंचायतीची कागदपत्रेही खराब होत आहेत.
ग्रामपंचायत आणि गावकऱ्यांनी या इमारतीचे बांधकाम करण्याची अनेकदा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला पत्र देउन मागणी केली. मात्र, त्यांनी अद्यापही याची दखल घेतली नाही. इमारतीची त्वरीत दुरूस्ती करवी, अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.