गोंदिया - आमगाव तालुक्यातील बाम्हणी गावातील मुलानेच आपल्या जन्मदात्या आईची क्षुल्लक कारणावरून कुऱ्हाडीने घाव घालून हत्या केल्याची घटना घडली. त्यानंतर आज गावात एकच खळबळ उडाली. हत्या करणाऱ्या आरोपीला आमगाव पोलिसांनी अटक केली आहे. प्रमोद मनीराम शेंडे (वय-३८) असे संशयित आरोपीचे नाव आहे.
गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यात बाम्हणी या गावातील प्रमोद मनीराम शेंडे हा नेहमीप्रमाणे गोठ्यात पलंगावर झोपत असे, नेहमीप्रमाणे आईने गोठा स्वच्छ करण्यासाठी प्रमोदला सकाळी उठवले. मात्र, आज सकाळी साडेसहा वाजताच्या दरम्यान गोठ्यात झोपलेल्या प्रमोदला त्याची आई मिनाबाई शेंडे (वय- ५५) नेहमीप्रमाणे हाक देऊन उठवू लागली. झोपेतून लवकर उठवल्याचा राग घेत प्रमोदने कुऱ्हाडीने आईच्या डोक्यात घाव घातला, त्यात मिनाबाई शेंडे गंभीर जखमी झाल्या.
रक्तबंबाळ झालेल्या मिनाबाईला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, जखम मोठी असल्याने त्यांना उपचारासाठी गोंदिया येथे दाखल करण्यासाठी सांगण्यात आले. मात्र, गोंदिया येथे उपचारादरम्यान मिनाबाई शेंडे यांचा मृत्यू झाला. मृत मिनाबाई यांचे पती मनिराम शेंडे (वय ५८) यांच्या तक्रारीवरून जन्मदात्या आईची हत्या करणाऱ्या मुलाविरुद्ध ३०२ कलम अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा- गोंदियातून शंभर कामगारांचा आंध्रप्रदेशच्या दिशेने प्रवास; तब्बल 900 किमी पायी अंतर कापणार