गोंदिया - राज्यभरात अनेक ठिकाणी अनेक ठिकाणी आज मान्सून पूर्व पाऊस बरसला. याचसोबत जिल्ह्यात देखीलल अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे फक्त सडक अर्जुनी तालुक्यात ३१.२ मिमी पाऊस झाला आहे.
यावेळी वादळी वाऱ्यामुळे अनेक झाडांची पडझड झाली असून केळी बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सडक अर्जुनी तालुक्यातील शेंडा-कोयलारी या गावात राहणारे तरुण शेतकरी विनोद पुस्तोडे यांच्याकडे चार एकर शेती आहे.मागील पाच वर्षांपासून केळीची लागवड करत आहेत. सप्टेंबर महिन्यात त्यांनी चार एकरात जवळपास पाच हजारांच्या जवळपास केळीची लागवड केली होती. आता अनेक झाडांना केळी देखील लागली होती. मात्र अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने या पिकाचे नुकसान झाले आहे.
अवकाळी पावसामुळे संपूर्ण केळीची बाग जमीनदोस्त झालीय. त्यामुळे या शेतकऱ्याचे तब्बल पाच लाखांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस बरसला असून सर्वाधिक पावसाची नोंद सडक अर्जुनी तालुक्यात झालीय. वादळी वाऱ्यामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाल्याचे समोर आले. या नुकसानाबाबत स्थानिक प्रशासनाने पाहाणी केली आहे. सध्या शेतकरी नुकसान भरपाई देण्याची मागणी करत आहेत.