गोंदिया - मानधनात वाढ करण्यात यावी या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी ३ सप्टेंबर पासुन शेकडो आशा कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत आहेत. येत्या सोमवारपर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास आत्महदहनाचा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच, उद्या(१४ सप्टेंबर) माजी सामाजिक मंत्री राजकुमार बडोले यांच्या घरावर हल्ला मोर्चादेखील नेणार असल्याचे आशा सेविकांनी सांगितले आहे.
जिल्ह्यातील १ हजार २०० आशा सेविका आरोग्य विभागाअंतर्गत ग्रामीण व शहरी भागात आरोग्य सेवा देत आहेत. आशा कर्मचार्यांना ठराविक मानधन न देता कामानुसार कमीत कमी १ हजार ८00 ते २ हजार ५00 रुपये मानधन दिले जाते. तर गट प्रवर्तकांना प्रवास व दैनंदिन भत्ता मिळून ८ हजार ७२४ रुपये मानधन देण्यात येते. कामाच्या बदल्यात मिळणारा हा मोबदला अत्यंत तुटपुंजा असल्याने आशा कर्मचार्यांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आशा सेविकांना १0 हजार व गटप्रवर्तकांना १५ हजार रुपये वेतन देय करुन ६0 वषार्नंतर सेवानवृत्ती पेंशन लागू करण्याच्या मागणीसाठी प्रशासनाकडे आशा कर्मचार्यांचा पाठपुरावा सुरु आहे. यादरम्यान, शासनाकडून आशा कर्मचार्यांच्या मानधनात वाढ करण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र, त्यसंबंधीचा निर्णय अद्यापही काढण्यात आलेला नाही. त्यामुळे आशा कर्मचार्यांमध्ये रोष आहे.
हेही वाचा - पोलीस भरतीत एकही जागा नाही, ओबीसी तरुणांनी गोदिंयात काढला मोर्चा
आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील आशा कर्मचार्यांनी ३ सप्टेंबर पासुन बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. आज या आंदोलनाला ११ दिवस होत असुन जिल्हाधिकारी कार्यालय धरणे आंदोलन सुरूच आहे. दरम्यान, मागण्या त्वरीत मान्य करण्याचे निवेदन आंदोलकांकडून प्रशासनला देण्यात आले आहे. मागण्या मान्य होईपर्यंत कामबंद आंदोलन सुरु ठेवणार असल्याचा इशाराही आशा सेविकांनी दिला आहे.