गोंदिया - गर्भवती महिला व लहान मुलांना रुग्णसेवा देता यावी यासाठी आरोग्य विभागाकडून (१०२) रुग्णवाहिका सेवा पुरवण्यात येते. मात्र, संबंधित विभागाकडून रुग्णवाहिका चालकांना त्यांचे वेतन व भत्ते देण्यात टाळाटाळ होत असल्याने त्यांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे.
याआधी देखील सरकारकडून कंत्राट देण्यात आलेल्या कंपन्यांनी वाहन चालकांना वेळेत व नियमानुसार वेतन न दिल्याने त्यांनी संप पुकारला होता. यासाठी ६८ रुग्णवाहिका चालकांनी १८ नोव्हेंबर पासून जिल्हा परिषदे समोर आमरण उपोषणाला सुरुवात केली होती. मात्र, माध्यमांनी आंदोलनाची दखल घेतल्यानंतर प्रशासनाने कंपनीला फटकारत चालकांचे वेतन व मागण्या पूर्ण करण्यासाठी भाग पाडले. यानंतर संबंधित आंदोलन मागे घेण्यात आले.
मात्र, कंपनीने मागील दोन महिन्यांपासून पुन्हा चालकांचे वेतन व भत्ते थकल्याने ही सेवा पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. याचा मोठ्या प्रमाणात फटका स्थानिकांना होत आहे. या कंपनीचे कंत्राट मध्यप्रदेश राज्यातील भोपाल येथील अश्कोम मीडिया प्रा. लिमीटेड या कंपनीला देण्यात आले आहे. तर, कंपनी अंतर्गत जिल्ह्यात एकूण ६८ रुग्णवाहिका आहेत.