गोंदिया - बहुप्रतिक्षित आणि मागील अनेक वर्षांपासून उड्डाणाच्या प्रतीक्षेत असलेल्या गोंदिया येथील बिरसी विमानतळातून येत्या १३ मार्च रोजी हवाई वाहतूक सुरू होणार आहे. यासाठी आवश्यक तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. परिषदेत फ्लायबिग विमान कंपनीचे संजय मांडवीया, खासदार सुनिल मेंढे, बिरसी विमानतळ प्राधिकरणाचे निदेशक के.व्ही बैजू सदस्य गजेंद्र फुंडे, डाॅ. प्रशांत कटरे आदी उपस्थिती होते.
खासदार मेंढे यांनी म्हटले की, या विमानतळावरून डोमेस्टिक फ्लाइट (घरगुती उड्डाण) सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बिरसी विमानतळावरून प्रवासी वाहतूक सुरू होणार असल्याने जिल्हावासियांत उत्साह दिसून येत आहे. तर, येत्या १३ मार्च रोजी या विमानतळावरून पहिले प्रवासी विमान सकाळी 8.30 मिनिटांनी हैद्राबादकरीता उड्डाण घेणार आहे. विमना सेवेला माजी मंत्री प्रफुल पटेल यांनी देखील शुभेच्छा दिल्या. गोंदिया जिल्ह्यातील व्यापारी व पर्यटनाला मोठा प्रतिसाद मिळणार आहे.
खासदार सुनील मेंढे यांनी बिरसी विमानतळावरून प्रवासी वाहतूक सुरू व्हावी यासाठी गेल्या दोन वर्षांपासून विषय लावून धरला होता. गोंदिया येथील बिरसी विमानतळ तयार होऊनही प्रत्यक्ष प्रवासी वाहतुकीला सुरुवात झाली नव्हती. या ठिकाणी प्रशिक्षित झालेले वैमानिक देशात विविध ठिकाणी सेवा देत आहेत. मात्र, प्रवासी वाहतुकीचा प्रश्न शासन दरबारी रेंगाळत होता. तो खासदार मेंढे यांनी सातत्याने पाठपुरावा करीत निकाली काढला आहे.
केंद्रीय नागरी वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी उड्डाण योजनेंतर्गत गोंदियाच्या बिरसी विमानतळावरून प्रवासी वाहतूक सुरू करण्यास मंजुरी देत 13 मार्च ही तारीख निश्चित केली. त्या अनुषंगाने फ्लायबिग विमान कंपनीचे संजय मांडवीया, खासदार सुनिल मेंढे, बिरसी विमानतळ प्राधिकरणाचे निदेशक के.व्ही बैजू सदस्य गजेंद्र फुंडे, डाॅ. प्रशांत कटरे आदींच्या उपस्थितीत आज बैठक पार पडली. यात सर्व बाबींचा आढावा घेण्यात आला. आंतरराष्ट्रीय स्तराचे बिरसी येथील विमानतळाच्या प्रवासी वाहतुकीचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
गोंदिया मार्गे इंदूर, हैदराबाद, विमानसेवा प्रत्यक्षात सुरू होत आहे. बिग चार्टर एअर लाइन्स (फ्लाय बिग) या कंपनीने बिरसी विमानतळावरून मध्य प्रदेशातील इंदूर-गोंदिया-हैदराबाद आणि हैदराबाद ते गोंदिया-इंदूर येथे प्रवासी विमानसेवेला हिरवी झेंडी दाखविली आहे. यामुळे गोंदिया जिल्हा आता चार्टर विमानसेवेने जोडला जाणार आहे. विमानतळाचा परवाना देण्यासाठी डीजीसीएच्या पथकाने बिरसी विमानतळाची धावपट्टी व सुरक्षेचे निरीक्षण केल्यानंतर क्षेत्रीय विमानसेवा सुरू करण्यास हिरवी झेंडी दिली आहे.
1 मार्चपासून तिकिट विक्रीला सुरवात
‘फ्लाय बिग’ या विमान कंपनीद्वारे इंदूर-गोंदिया-हैदराबाद व हैदराबाद-गोंदिया-इंदूर विमानसेवा सुरू करण्यासाठी कंपनीने ७२ खुर्ची एटीआर विमान निवडल्याची माहिती कंपनीचे व्यवस्थापक संजय मांडविया यांनी दिली. सोबतच या मार्गावर 1 मार्चपासून प्रवाशांना आपले तिकिट बुकींग ऑनलाईन करता येणार असल्याचे सांगितले. गोंदिया विमानतळावरही आफलाईन बुकिंगची सोय करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. 72 आसन क्षमता असलेल्या या विमानात पहिल्या 36 प्रवाशांना 1999 रुपयात गोंदिया ते हैद्राबाद व गोंदिया ते इंदोर तिकीट उपलब्ध होणार असल्याचे सांगितले. त्यांनतर 2600 रुपयापर्यंत तिकिटाचे दर जाणार असेही सांगितले. दरदिवशी इंदुर येथून सकाळी 7 वाजता हे विमान निघेल व गोंदियाला 8.15 वाजता पोहचेल. गोंदियावरून सकाळी 8.45 वाजता निघेल व हैद्राबादला 10.15 वाजता पोहचेल. तेच विमान सायकाळला परत येईल.
बिरसी विमानतळावर होणार कार्यक्रम
१३ मार्च रोजी या विमानतळावरून पहिले प्रवासी उड्डाण होणार आहे. यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. केद्रीय नागरी वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हे इंदोर येथून विमानसेवेला हिरवी झेंडी दाखवणार आहेत. मात्र, त्यांना गोंदियाच्या बिरसी विमानतळावर आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती खासदार सुनिल मेंढे यांनी दिली. सोबतच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, माजी केंद्रीय विमानवाहतूक मंत्री व खासदार प्रफुल पटेल, खासदार अशोक नेते, बालाघाटचे खासदार ढालसिंह बिसेन आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या सेवेचा प्रारंभ होणार आहे.
पर्यटन व व्यापारासाठी होणार फायदा
विमानतळापासून सारख्या अंतरावर असलेली गोंदिया-बालाघाट ही मोठी बाजारपेठ आहे. या विमानसेवेचा लाभ गोंदियासह शेजारी जिल्हे तसेच, सीमावर्ती मध्य प्रदेश व छत्तीसगड राज्यातील काही जिल्ह्यातील प्रवासी, व्यापारी, अधिकाऱ्यांना होणार आहे. गोंदियापासून 100 किमीवर असलेल्या आंतरराष्ट्रीय कान्हा व्याघ्र प्रकल्पाच्या विदेशी व देशी पर्यटकासांठी हे महत्वाचे विमानतळ ठरणार आहे. तसेच, भविष्यात नवी मुंबईचे विमानतळ सुरू होताच गोंदिया - मुंबई या विमानसेवेचाही मार्ग लवकरच खुला होईल, असा आशावाद खासदार सुनिल मेंढे यांनी व्यक्त केला. देशविदेशातील मोठ्या विमानतळांकडे उड्डाणे भरण्याची संधीही उपलब्ध होऊ शकते. या विमानतळावरून प्रवासी व माल वाहतूक सेवेची प्रतीक्षा जिल्हावासीयांना होती त्या दृष्टीने हे पाऊल महत्वाचे राहणार आहे.
बिरसी विमानतळावरील नाईट लँडीगची सुविधा काढली
तत्कालीन केंद्रीय विमान वाहतूक मंत्री प्रफुल पटेल यांच्या पुढाकाराने गोंदियाच्या बिरसी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ तयार करण्यात आले. याठिकाणी शासकीय व अशासकीय वैमानिक प्रशिक्षण सध्या सुरू असून, रात्रीला सुद्धा विमान उतरण्याची व धावण्याची सोय या धावपट्टीवर त्यांनी करून ठेवली होती. मात्र, गेल्या कोरोना काळात येथील ती सुविधा केंद्रीय विमानपतनन विभागाने बंद करून कोलकत्ता येथे हलविल्याने विदर्भातील नागपूर वगळता गोंदियात असलेली नाईट लँडीग सुविधा बंद करण्यात आल्याने प्रशासनाविरोधात नागरिकांत नाराजी दिसून येत आहे.
ब्रिटिश कालीन विमानतळ आहे
बिरसी विमानतळ हे ब्रिटिश कालीन असून ब्रिटिश सरकारद्वारे द्वितीय विश्व युद्ध १९४२-४३ च्या दरम्यान बनविण्यात आले होत. भारतीय उप महाव्दीप केंद्र असल्यामुळे अंतनिर्हित लाभासाठी या स्थळाची निवड करण्यात आली होती. भारतात रॉयल एयरफोर्सच्या उपस्थिती वर्ष १९८४ मध्ये प्रिंस फिलिपचे या विमानक्षेत्रावर आगमन झाले होते. त्या नंतर वर्ष २००५ मध्ये प्रफुल मनोहरभाई पटेल, माझी नगर विमानन मंत्री, भारत सरकार व्दारा या विमानक्षेत्रच्या आधुनिकीकरणासाठी महत्वपूर्ण योगदान दिले. १२६७ एक रात हे क्षेत्र पसरलेला असून हा विमानक्षेत्र विश्व स्तरीय उपकरणीय सुविधांसोबत वायू यातायात नियंत्रण, मॉर्डन नेविगेशन आणि नाईट लॅडिंग सुविधापासून सुसज्जीत आहे. वाढत्या हवाई यात्रेला बघता नगर विमानन क्षेत्रामध्ये समग्र विकासाला बघत विमानक्षेत्राला विश्व स्तरीय सुविधांनी सुसज्जीत करण्यात आले आहे.
हेही वाचा - गोंदिया - भंडारा जिल्ह्यातील अडकलेल्या विद्यार्थ्यांना सुखरूप आणण्याचे प्रयत्न करत आहे - प्रफुल पटेल