गोंदिया - दहा लाखाच्या खंडणीसाठी आमगाव तालुक्यातील बनगाव येथील एका १७ वर्षाच्या मुलाचा गळा आवळून खून केल्याप्रकरणी आमगाव पोलिसांनी एकाला अटक केली. दुर्गाप्रसाद सुखचंद हरिणखेडे (वय २४ रा. नवेगाव खैरलांजी,मध्यप्रदेश) असे आरोपीचे नाव असून न्यायालयाने ७ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती. आज सकाळी साडे सात वाजताच्या सुमारास आरोप पोलीस स्टेशन आवारातील शौचालयात जात असता पोलिसाला झटका देऊन फरार झाला. पोलीस कोठडीतून आरोपी फरार झाल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.
आरोपी फरार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. मृतकाच्या कुटुंबातील नागरिकांसह परिसरातील नागरिकांनी आमगाव पोलीस ठाण्यात गर्दी केली. विशेष म्हणजे यापुर्वी याच पोलीस ठाण्यात एका आरोपीचा मारहाणीदरम्यान पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याचे प्रकरण घडले होते. त्यावेळी पोलीस अधिकारी व कर्मचारी निलंबित झाले होते. आत्ता या प्रकरणामुळे पुन्हा आमगाव पोलीस ठाणे चर्चेत आले आहे. आमगाव पोलीस ठाणे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे कार्यालय एकमेकाला लागून आहे. त्यामुळे हा प्रकार कसा घडला असा सवाल नागरिकांनी केला आहे. यांसदर्भात पोलीस निरिक्षक विलास नळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.