गोंदिया : जिल्ह्यातील सालेकसा पोलिसांच्या खासगी वाहनाचा अपघात होऊन, एका पोलीस शिपायाचा मृत्यू झाला आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येला ही दुर्घटना घडली. अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त अशा भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांसोबत सालेकसा पोलिसांनी दिवाळी साजरी केली. त्यानंतर परतत असताना हा दुर्दैवी अपघात झाला.
नियंत्रण सुटल्याने अपघात
सालेकसामधील पाथरा टोला या गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. यात विनोद मारबदे (३०) या पोलीस शिपायाचा मृत्यू झाला. तर, राजू पंधरे, बाळकृष्ण जांबुळकर, खेमराज कोरे हे तिघे जखमी झाले. जखमींना गोंदिया शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आदिवासी बांधवांमध्ये आनंद पसरवून येत असताना, ऐन दिवाळीत पोलीस शिपायाचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
दिवाळीच्या पूर्वसंध्येला राज्यभरात अपघात..
या दिवाळीच्या सुरुवातीलाच राज्यभरात ठिकठिकाणी अपघातांची नोंद झाली आहे. पुणे- बंगळुरू आशियाई महामार्गावर उंब्रज (ता. कराड) येथील तारळी नदीच्या पुलाचा कठडा तोडून ट्रॅव्हलर ५० फूट खोल नदीपात्रात कोसळली. यामध्ये ट्रॅव्हलरमधील ५ जण जागीच ठार झाले. तर सहा जण गंभीर जखमी आहेत. तसेच, दिवाळीचे कपडे खरेदी करण्यासाठी एकाच मोटरसायकलवरून अकोला निघालेल्या सहा जणांच्या मोटर सायकलला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातातील तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. अकोला पातुर महामार्गावरील शिर्ला बुद्धभूमी समोर हा अपघात झाला.
यासोबतच आज (शनिवार) पुणे-सोलापूर महामार्गावर रुग्णवाहिकेचा अपघात झाला. या अपघातात 3 जण ठार झाले असून 13 जण जखमी झाले आहेत. मृत आणि जखमींना सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा : प्रवाशांना दिलासा! दिवाळी निमित्त भंडारा आणि गोंदिया आगारातून 44 जादा बस सोडण्यात येणार