गोंदिया - बालाघाट पोलिसांनी ७ जुलै रोजी अटक केलेल्या आठ जणांपैकी एक आरोपी घनश्याम शिवलाल आचले (रा. परसोडी, पो. फुटाणा, ता. देवरी) यांच्या शेतात असलेल्या झोपडीतून एके-४७ बंदुकीचे ५२ राउंड काडतुसे १९ ऑगस्ट रोजी जप्त करण्यात आले. ही कारवाई गोंदिया पोलिसांनी केली आहे.
मध्य प्रदेशच्या किरनापूर किन्ही जंगलात नक्षलवाद्यांना शस्त्र पुरवठा करण्यासाठी फिरत असलेल्या आठ जणांना बालाघाट पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्याजवळून तीन पिस्तूल, तीन मॅक्झिन, एके-४७, आठ मोबाईल, चारचाकी दोन वाहने, एलईडी, टॉर्च, हवा पंप, एपमीथ्री प्लेयर, पर्स, सुटकेस, तीन बॅग सामान जप्त करण्यात आले होते. गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील परसोडी येथील घनश्यामच्या झोपडीतून एके-४७ या बंदुकीचे ५२ राउंड गोंदिया पोलिसांनी जप्त केले आहेत.
हेही वाचा - नारायण राणेंना अटक करताना बंद खोलीत असा घडला हायहोल्टेज ड्रामा, पाहा VIDEO
नक्षल्यांचा रेस्ट झोन म्हणून गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा, देवरी, आमगाव, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील जंगल परिसर ओळखला जातो. असे असले तरी, नक्षल्यांच्या कारवाया जिल्ह्यात होत राहतात. त्यातच शहरातील एका माजी नगरसेवकासह देवरी तालुक्यातील चिचगड येथील दोन असे एकूण ८ आरोपींना नक्षल्यांना शस्त्रसाठा पुरविण्यात असल्याच्या कारणावरून अटक केली होती. दरम्यान, हे सर्व आरोपी मध्यप्रदेश राज्यातील बालाघाट पोलिसांच्या ताब्यात आहेत. आरोपींची चौकशी सुरू आहे. त्यापैकी चिचगड येथील दोन आरोपींची पोलिसांनी कसून चौकशी केली असता, त्या आरोपींनी लपवून ठेवलेले ५२ एके-४७ चे जिवंत काडतूसे पोलिसांनी चिचगड परिसरातील शेतशिवारातून हस्तगत केले. त्यामुळे जिल्ह्यात नक्षल्यांना शस्त्र पुरवठा करण्याचा गोरखधंदा पोलिसांनी उजेडात आणला. शेतशिवारात पुरवून ठेवलेले काडतुसे हस्तगत केल्याने जिल्ह्यात अजून किती शस्त्रसाठा आहे हे चौकशी नंतरच निष्पन्न होणार आहके. या प्रकरणी पोलिसांनी ३, २५, २६ भारतीय हत्यार कायदा सहकलम १८, २०, २३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
चिचगड ठाण्यात गुन्हा दाखल
पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली सी-६० पथक, चिचगड पोलिसांनी ही कारवाई केली आहे. यासंदर्भात चिचगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी दिली आहे.
हेही वाचा - आधी मुख्यमंत्र्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा - नितेश राणे