गोंदिया - सध्या सर्वत्र कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याने चिंतेचे वातावरण आहे. गोंदिया जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचा दर ९८.५ टक्के असून मृत्यू दर १.२५ टक्के आहे. जिल्हात आतापर्यंत २१५ जण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहे.रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर नगरपंचायतने २५ जुलैपासूूून तीन दिवस जनता कर्फ्यू लागू केला आहे.
कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण राज्यामध्ये सर्वात जास्त गोंदया जिल्ह्यात आहे. मात्र, बाहेरून येणाऱ्या लोकांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण जास्त आहे. काल गोंदिया जिल्ह्यात तीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी देवरी तालुक्यात दोन कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यातील एक कोरोना रुग्ण हा देवरी शहरातील मध्य भागात राहत असून हा रुग्ण नागपूरवरून आला व त्याची तपासणी केली असता ती कोरोना पॉझिटिव्ह आली.
देवरी नगरपंचायतने तीन दिवसाचा जनता कर्फ्यू करण्याचे ठरविले आहे. यामध्ये देवरी शहरातील व्यापारी वर्गाची बैठक घेण्यात आली असून, त्यांनी या निर्णयाला पाठींबा दिला आहे. तीन दिवस देवरी शहरात जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. २४ जुलैला हा निर्णय घेण्यात आला. चौथ्या दिवशी जनता कर्फ्यू नसला तरी पाचव्या दिवसापासून पुन्हा तीन दिवस जनता कर्फ्यू लागू करण्यात येणार आहे.