गोंदिया - जिल्ह्यात काल कोरोना पॉझिटिव्ह असलेला पहिला रुग्ण आढळून आला आहे. हा रुग्ण २१ मार्चला शहरातील स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत जाऊन आला होता. येथे तो २ तास उपस्थित असल्याची माहिती बँकेचे जिल्हा प्रबंधक यानी जिल्हाधिकाऱ्यांना दिली आहे. या पार्श्वभूमीवर आज संपूर्ण बँकेत निर्जंतुकीकरण करण्यात आले.
हा रुग्ण १७ मार्चला थायलंडवरून गोंदियाला आला होता. त्याचे विलगीकरण करण्यात आले होते. रुग्णाला त्याच्यासोबत विदेशातून आलेल्या छत्तीसगडच्या राजनांदगाव येथील मित्राला कोरोना झाल्याचे कळाले होते. त्यानंतर रुग्णाने २६ मार्चला जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन आपली तपासणी केली. या रुग्णाचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
हा रुग्ण शहरातील स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत जाऊन आला होता. त्यामुळे, बँकेतील कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांचे १४ दिवसासाठी विलगीकरण करण्यात यावे, अशी मागणी बँकेकडून होत आहे. बँकेने रुग्णाचे सीसीटीव्ही फुटेज जिल्हाधिकाऱ्यांना दिले असून बाकी लोकांची देखील माहिती घेण्यात यावी, असे आपल्या पत्रात सुचविले आहे.
हेही वाचा- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात जंतुनाशक फवारणी