गोंदिया- जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यातील हाजराफॉल धबधब्या जवळ वाढदिवस साजरा करायला गेलेल्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल आहे. हेमंत साते (१८) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात दु:खाचे वातावरण पसरले आहे.
जिल्ह्याच्या मरार टोली भागात राहणाऱ्या हेमंत साते या मुलाचा रविवारी वाढदिवस होता. वाढदिवस साजरा करण्यासाठी तो आपल्या तीन मित्रांसह सालेकसा तालुक्यातील हाजराफॉल धबधब्यावर पार्टी करायला गेला होता. यावेळी हेमंत याला पाण्यात पोहण्याचा मोह आवरला नाही. तो नाल्याच्या वरील भागात वाहत असलेल्या पाण्यात उतरला. मात्र, खोलगट भागचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. रविवारी संध्याकाळपर्यंत त्याचा शोध घेतला गेला. मात्र, आज सकाळी ११ वाजताच्या दरम्यान त्याचा मृतदेह हाती लागला. वाढदिवसाच्या दिवशीच त्याचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.