गोंदिया : आमगाव तालुक्याच्या बनगाव येथील एका १७ वर्षाच्या मुलाचा गळा आवळून हत्या ( Murder For Ransom ) करण्यात आल्याची घटना आज २३ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. चेतन नरेश खोब्रागडे १७ वर्ष रा. बनगाव ता. आमगाव असे मृत मुलाचे नाव आहे.
घरी न परतल्याने शोधाशोध
२२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता चेतन खोब्रागडे हा आपल्या मोठी आईच्या घरी रिसामा येथे जाण्यासाठी निघाला होता. मात्र रात्र झाली तरी तो घरी न परतल्याने घरच्यांनी त्याचा शोधा-शोध घेणे सुरु करत विचारपूस सुरु केली. मुलगा घरी न परतल्यामुळे वडिलांनी रात्री पोलीस ठाणे आमगाव येथे मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार केली. रात्री उशिरा फोन आला व चेतनचे अपहरण केले असून, १० लाख रूपयाची खंडणी द्या अशी मागणी केली होती.
फोनवरून लागला सुगावा
याची माहिती पोलिसांना दिली असता पोलिसांनी खंडणीसाठी जो फोन आला तो फोन क्रमांक कुणाचा आहे याचा तपास केला. तो फोन दुर्गाप्रसाद सुखचंद हरिणखेडे २४ वर्ष रा. नवेगाव खैरलांजी (मध्यप्रदेश) याच्या असल्याचे लक्षात आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता आरोपीने घटनास्थळ गाठले. पोलिसांनी श्वानपथकाच्या आधारे बोदा येथील शेतात असलेल्या तणसच्या ढिगाऱ्याजवळ चप्पल आढळल्याने त्या चप्पलजवळ जाऊन श्वान थांबला. पोलिसांनी तनसाच्या ढिगाऱ्याचा शोध घेतला असता १७ वर्षीय चेतनचा मृतदेह आढळला. चेतन हा आयटीआयमध्ये शिकत घेत होता. या घटनेसंदर्भात आमगाव पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून, एकाला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विलास नाळे करत आहेत.