गोंदिया - बाई गंगाबाई महिला व बाल रूग्णालय असून, या रुग्णालयात वर्षभरात 141 मातांनी गर्भाशयातच आपले मातृत्व गमावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी या बाबत माहिती दिली आहे. खानपान, गर्भवतीपणात घ्यावयाच्या काळजीचा अभाव, अल्पवयात लादण्यात येणारे मातृत्व, अंधश्रद्धेचा पगडा, दैवीशक्तीवर अधिक विश्वास यामुळे हा सारा प्रकार घडत असल्याची चर्चा गोंदिया जिल्ह्यात आहे.
हेही वाचा - सेक्स रॅकेट चालविणाऱ्या बॉलिवूड कास्टिंग डायरेक्टरला अटक
सुरक्षित बाळंतपणासाठी तसेच माता व बालमृत्यू टाळण्यासाठी शासनाने विशेष काळजी घेतली आहे. गर्भधारणेपासून तर, प्रसुतीपर्यंत योग्य दखल घेण्याच्या सूचना आरोग्य विभागाला किंबहुना रुग्णालयांना दिल्या आहेत. मात्र, गोंदिया जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या सालेकसा तालुक्यात तसेच शेजारच्या मध्यप्रदेशात अजूनही अंधश्रद्धेचा, पगडा आज ही कायम आहे. बहुतांश मातापालक रुग्णालयात प्रसूती करण्यास अजूनही टाळत असल्याचे दिसून येते. सालेकसा तालुक्यात आदिवासींची संख्या अधिक आहे. त्यावरही खानपान, जनजागृतीचा अभावदेखील आढळून येतो. नक्षलग्रस्त असलेल्या जिल्हा असला तरी प्रशासनाचेही या जिल्ह्याकडे दुर्लक्ष होत आहे. अनेक योजना ज्या आहेत त्या मात्र कागदोपत्रीच नोंदी केल्या जात आहेत. हा प्रकारही मारक ठरू लागला आहे.
मागील वर्षी म्हणजेच 2019 वर्षीचा आकडा पाहिला तर, जानेवारी ते डिसेंबर महिन्यात एकुण 141 मातांनी गर्भाशयात आपले मातृत्व गमावले आहे. जानेवारी 2019 मध्ये 20, फेब्रुवारीत 8, मार्च 15, एप्रिल 13, मे 13, जून 8, जुलै 9, ऑगस्ट 14, सप्टेंबर 13, आक्टोबर 11, नोव्हेंबरमध्ये 7 तर डिसेंबरमध्ये 10 अशा एकुण 141 मातांनी गर्भाशयातच मातृत्व गमावले आहे. अतिशय कठीण प्रसंगीच गर्भवती माता रूग्णालयात दाखल होत असतात. परंतु, तोपर्यंत उशिर झाला असतो. असेही रूग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे. अल्पवयात लादण्यात येणाऱ्या मातृत्वाची संख्याही धक्कादायक अशीच आहे. अंधश्रध्दा, दैवीशक्तीवर अधिक भर सालेकसा तालुक्यातील आदिवासींबहुल भागात आजही कायम आहे.