गडचिरोली - जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयात लिपिक म्हणून कार्यरत असलेल्या एका तरुणीची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. त्यानंतर तिचा मृतदेह नाल्यात फेकल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सायंकाळी समोर आली. चंद्रप्रभा देवराव अप्पलवार (वय 32) रा. कारवाफा ता. धानोरा असे तरुणीचे नाव आहे.
चंद्रप्रभा ही नोकरीच्या निमित्ताने गडचिरोलीत एकटीच राहत होती. सोमवारी कार्यालयात आल्यानंतर सायंकाळी चार वाजताच्या सुमारास नातेवाईक आल्याचे सांगत कार्यालयातून ती बाहेर पडली. मात्र ती परत आलीच नाही. त्यानंतर दोन दिवस ती बेपत्ता होती. दरम्यान गुरुवारी तिचा मृतदेह नवरगाव गावाजवळील पोहार नाल्यात आढळून आला. मृतदेह पाण्यात कुजल्याने ओळख पटवण्यात बराच वेळ गेला.
घटनास्थळाची पाहणी केली असता, तिचा गळा चिरलेल्या अवस्थेत आढळला. गुरुवारी सायंकाळी प्राथमिक अहवाल प्राप्त होताच गडचिरोली पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध कलम 302 अन्वये या गुन्ह्याची नोंद केली आहे. विशेष म्हणजे ज्या नाल्यात चंद्रप्रभाचा मृतदेह आढळून आला त्या नाल्यापासून काही अंतरावर दुसऱ्या एका नाल्यात तिचे दुचाकी वाहन आढळून आले. त्यामुळे आरोपीने पुरावा नष्ट करण्याच्या पूर्ण प्रयत्न केला असल्याचे दिसत आहे.
प्रेम प्रकरणातून तिची हत्या करण्यात आली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून अधिक तपास गडचिरोली पोलीस करीत आहेत.