गडचिरोली : येथील गोंडवाना विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ 28 जानेवारी रोजी चंद्रपुरात आयोजित केला आहे. विद्यापीठ गडचिरोलीत असताना दीक्षांत समारंभ मात्र, चंद्रपुरात आयोजित केल्याने संतप्त झालेल्या गडचिरोली युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी आंदोलन केले. सायंकाळी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर त्यांनी मुंडन आंदोलन करून निषेध नोंदवला.
राज्यपाल राहणार आहेत प्रमुख पाहुणे -
28 जानेवारीला गोंडवाना विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ चंद्रपूर शहरातील वन प्रबोधिनीच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या समारंभाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. आतापर्यंतचे दीक्षांत समारंभ गडचिरोलीत पार पडले असताना कोरोना महामारीच्या काळात दीक्षांत समारंभ चंद्रपुरात घेण्याचे काय कारण? गडचिरोलीतील विद्यापीठ चंद्रपुरात हलवण्याचा डाव तर नाही ना? असा सवाल युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनादरम्यान केला.
विद्यापीठाची धुरा प्रभारीच्या खांद्यावर -
आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या विकासासाठी 2009 मध्ये गडचिरोली येथे गोंडवाना विद्यापीठाची स्थापना झाली. या विद्यापीठामध्ये चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील दोनशेहून अधिक महाविद्यालय संलग्न आहेत. परंतु सद्यस्थितीत या विद्यापीठाचा कारभार प्रभारीच्या खांद्यावर सुरू आहे. कुलगुरू डॉ. नामदेव कल्याणकर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर प्रभारी कुलगुरू म्हणून रामटेक येथील संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वरखडे यांच्याकडे प्रभार देण्यात आला. तर कुलसचिव ईश्वर मोहूर्ले यांचा कार्यकाळही संपल्याने परीक्षा व्यवस्थापन मंडळाचे डॉ. अनिल चिताडे यांच्याकडे प्रभारी कुलसचिवाची धुरा आहे.
डाव हाणून पाडणार -
चंद्रपुरात आयोजित दीक्षांत समारंभ रद्द करून गडचिरोली येथेच घ्यावा. चंद्रपुरातील समारंभ रद्द न झाल्यास तीव्र आंदोलन करून कुलगुरूंना काळे फासण्यात येईल, असा इशारा युवक काँग्रेसचे महासचिव महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी दिला आहे. काही राजकीय पुढाऱ्यांच्या दबावामुळे दीक्षांत समारंभ चंद्रपुरात आयोजित करण्यात आला असून भविष्यात गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठ चंद्रपुरात हलवण्याचा कट रचला जात असल्याचा आरोपही महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी यावेळी केला.