गडचिरोली - अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर अतिक्रमणधारक महिलेने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्यातील आल्लापल्ली येथे मंगळवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. विशेष म्हणजे अतिक्रमणधारक जिल्हा पोलीस दलात सहाय्यक फौजदार म्हणून कार्यरत आहे. त्याच्याच पत्नीने पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
आलापल्लीत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीसाठी आरोग्य व पोलीस विभागाने संयुक्तपणे अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली होती. त्यासाठी नागरिकांनी विरोध दर्शवला. सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्यावर हल्ला करण्यापर्यंत हा विरोध टोकाला पोहोचला.
आरोग्य आणि पोलीस विभागाचा चमू घटनास्थळी अतिक्रमण हटाव मोहीम राबवत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप हजारे घटनास्थळी साध्या वेषात पोहोचले होते. यादरम्यान वाद उद्भवल्याने सुभाष मंडल नामक व्यक्तीच्या पत्नी आणि मुलीने सहाय्यक पोलीस निरीक्षक तसेच महिला पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण केली. आरोपींनी कुऱ्हाड-कोयत्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक हजारे यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पोलीस पथकाने प्रसंगावधान राखून आरोपी ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला.
अतिक्रमणधरक सुभाष मंडल गडचिरोली पोलीस मुख्यालयात सहाय्यक फौजदार म्हणून कार्यरत आहेत. मात्र, त्याच्याच पत्नीने पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तरीही आरोग्य आणि पोलीस विभागाच्या चमूने आपली कारवाई नेटाने पूर्ण केली असून घटनेसंबंधी अधिक कारवाई केली जात आहे.