गडचिरोली - इतर जिल्ह्यांप्रमाणे गडचिरोली जिल्हाही विकासाच्या प्रवाहात येत आहे. गडचिरोली जिल्ह्याची नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून असलेली ओळख भविष्यात पुसून टाकणार असून जिल्ह्यातील विविध विकासकामांना गती देण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करून जिल्ह्यातील आगामी ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भगवा फडकवण्याचे आवाहन राज्याचे नगरविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. गडचिरोली येथे आयोजित शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
सुरेंद्रसिंह चंदेल स्वगृही -
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत शिवसेना कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी शिवसेना पदाधिकारी सुरेंद्रसिंह चंदेल यांची स्वगृही वापसी झाली. शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. येत्या काळात गडचिरोलीतील शिवसेना कार्यकर्त्यांचे संघटन करून पक्षाचे काम अधिक दर्जेदार करणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करावे, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले.
गडचिरोली शहर विकासासाठी निधी -
गडचिरोली शहरातील रस्ते, नाले आदी कामे प्रगतीपथावर असून तलावाचे सुशोभीकरण, बगीचा, नगरपरिषदेला स्वतःची इमारत अशा अनेक महत्त्वपूर्ण गोष्टींचे बांधकाम भविष्यात केले जाईल. यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिला. यावेळी रस्त्यासाठी 5 कोटीचे नियोजन तात्काळ करण्यासाठीसंबंधित अधिकार्यांना फोनद्वारे सुचना दिल्या.