गडचिरोली - जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झालेले पाहिले पाच रुग्ण बरे होवून घरी परतल्यानंतर आज शनिवारी पुन्हा तीन रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. कोरोनामुक्त झालेल्या तीनही रुग्णांना टाळ्यांच्या गजरात घरी सोडण्यात आले. मात्र, गुजरात राज्यातून आलेले दोन नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण शनिवारी गडचिरोली तालुक्यात आढळून आले. आता गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 34 वर पोहोचली असून अॅक्टिव्ह रुग्ण 26 आहेत.
शनिवारी बरे झालेल्या रूग्णांमध्ये कुरखेडा आणि आरमोरी येथील एका रुग्णाचा समावेश आहे. हे सर्व रुग्ण 21 व 23 मे दरम्यान कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे निदर्शनास आले होते. आज ते कोरोनामुक्त झाले. जिल्हा सामान्य रूग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल रुडे यांच्या हस्ते त्यांना कोरोनामुक्त झाल्याचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
तीनही रुग्ण रुग्णवाहिकेने स्वतः च्या घरी रवाना झाले. त्यांना आता यापुढे सात दिवस गृह विलगीकरणात राहणे अनिवार्य करण्यात आले आहे. पुढील 7 दिवस आरोग्य विभागाकडून त्यांच्या घरीच त्यांच्या लक्षणांबाबत निरीक्षणे नोंदवली जाणार आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 34 एवढी आहे. त्यापैकी 8 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. उर्वरित 26 रुग्णांवर जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरु आहेत. यातील सर्व रुग्ण उपचारास चांगला प्रतिसाद देत असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.