गडचिरोली - उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी शहरांमध्ये समर कॅम्पचे आयोजन केले जातं. यासाठी मोठे शुल्कही असते. मात्र गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थी तेवढे शुल्क भरून समर कॅम्पमध्ये सहभागी होऊ शकत नाही. मात्र ही संधी गडचिरोली पोलीस दलाच्या पुढाकाराने आदिवासी विद्यार्थ्यांना उपलब्ध झाली आहे. अतिदुर्गम भामरागड तालुक्यातील सहा ठिकाणी आयोजित निःशुल्क समर कॅम्प मध्ये तब्बल हजाराहून अधिक विद्यार्थी सहभागी होत व्यक्तिमत्व विकासाचे धडे गिरवत आहेत.
गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनाही समर कॅम्पमध्ये सहभागी होता यावे, त्यांचा व्यक्तिमत्व विकास घडावा, यासाठी गडचिरोली पोलीस दल व गट साधन केंद्र भामरागडच्या पुढाकाराने भामरागड तालुक्यातील सहा ठिकाणी निशुल्क समर कॅम्प सुरू झाले आहे. विशेष म्हणजे, या समर कॅम्पमध्ये राहण्याची सोय करण्यात आली असल्याने या शिबिराला 'विशेष विद्यार्थी बाल आनंद निवास शिबिर' असे नाव देण्यात आले आहे. भामरागड तालुक्यातील भामरागड, गोंगवाडा, लाहेरी, नारगुंडा, ताडगाव, मनेराजाराम या केंद्रावर एकाच वेळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या सहाही केंद्रावर सुमारे 1 हजार 176 विद्यार्थी सहभागी झाले आहेत. दुसरी ते सातवी पर्यंतचे विद्यार्थी या शिबिरात सहभागी झाले. पोलिसांकडून विद्यार्थ्यांना कलर बॉक्स, नोटबुक, बालपेन, स्केच पेन, मार्कर पेन आधी साहित्याचे वितरण करण्यात आले आहे. सकाळी पाच ते सात वाजेपर्यंत योगा प्रशिक्षण, त्यानंतर अंघोळ व इतर कार्यासाठी वेळ दिला जातो. आठ ते नऊ वाजेपर्यंत नाश्ता त्यानंतर आदर्श परिपाठ, ग्रुप निर्मिती व सवंगडी परिचय, कृतीयुक्त गीत त्यानंतर भाषा व गणित विषयाशी सुसंगत उपक्रम, दुपारी एक ते तीन वाजेपर्यंत विश्रांती, त्यानंतर तीन वाजता पेपर आर्ट स्टोरी तयार करणे, कृतिशील गीते, टायर गेम, साखळी पूर्ण करणे, शब्दांची शर्यत, अंताक्षरी असे उपक्रम घेतल्यानंतर रात्रीचे जेवण त्यानंतर सकारात्मक व प्रेरणादायी उपक्रमांवर विद्यार्थ्यांना चित्रपट दाखवले जात आहे.
तसेच अभ्यासक्रमाव्यतिरिक्त विविध प्रकारच्या घर सजावटीच्या वस्तू तसेच दैनंदिन गरजेच्या वस्तू बनवण्याचे मार्गदर्शन, बांबू हस्तकला प्रशिक्षण असे विविध हस्तकलेचे प्रशिक्षण दिले जात आहे. या समर कॅम्पला जिल्हाधिकारी शेखर सिंग, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बळकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक मोहित कुमार गर्ग यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.