गडचिरोली - जानेवारीमध्ये फक्त जिल्ह्याच्या ठिकाणी शिवभोजन योजनेला सुरूवात करण्यात आली होती. आता राज्य शासनाकडून तालुकास्तरावर प्रत्येक ठिकाणी शिव भोजन सुरू करण्याबाबत सूचना केल्या आहेत. याच धर्तीवर आरमोरी, कुरखेडा व वडसा याठिकाणी शिवभोजन देण्यास सुरूवात झाली आहे. कोराना संसर्गाबाबत संचारबंदीदरम्यान गरीब व गरजू लोकांना अन्न मिळावे, त्यांची गैरसोय होऊ नये. म्हणून शासनाने या योजनेचा तालुकास्तरावरतीही विस्तार केला आहे.
जिल्हयाच्या ठिकाणी २०० थाळ्या तर तालुका निहाय ७० थाळ्यांची मर्यादा शिवभोजन थाळी योजनेत करण्यात आली होती. मात्र कोरोना बाबत यामध्ये आता अनलिमीटेड थाळ्या देण्यात येत आहेत. गरजू लोकांना अन्न मिळावे, या उद्देशाने सकाळी ११ ते दुपारी ३ यावेळेत ही सुविधा गरजू लोकांसाठी उपलब्ध आहे. शिवभोजन योजनेबाबत २८ मार्चच्या शासन निर्णय नुसार गडचिरोली जिल्हयातील प्रत्येक तालुक्यात शिवभोजन केंद्राची निवड करण्याकरीता अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक पुरवठादारांनी आपले अर्ज तालुकास्तरावर पुरवठा शाखेकडे जमा करावेत, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केले आहे.