गडचिरोली - देसाईगंज तालुक्यातील विहिरगाव रहिवासी असलेल्या हबीबखा रहमान पठाण यांचा काही दिवसांपूर्वी अकस्मात मृत्यू झाला. मात्र, हबीबखाने हे जग सोडून जाण्याच्याआधी भारतीय स्टेट बँक शाखा शंकरपूर येथे केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा फॉर्म भरून घेतला होता. त्यामुळे त्याच्या मृत्यूपश्चात पत्नी शाहिस्ता यांच्या बँक खात्यात नुकतेच या योजनेचे दोन लाख रुपये जमा झाले. त्यामुळे या कुटुंबाला आर्थीक आधार मिळाला आहे.
अत्यल्प भूधारक शेतकरी असलेला हबीबखा रहमान पठाण मोलमजुरी करून आपल्या संसाराचा गाडा हाकत होता. घरचा कर्ताधर्ता आणि आर्थिक रसद पुरवणारा हबीबखा असल्याने पत्नी शाहीस्ता आणि तीन मुली असे हे कुटुंब आनंदाने जीवन जगत होते. परंतु हबीबखा यांचा अकस्मात मृत्यू झाल्याने पठाण कुटुंब हताश झाला होता. अशावेळी कुटुंबाला गरज असते ती भावनिक तसेच आर्थिक सहकार्याची. त्यातच आपल्या भविष्याची चाहूल ओळखून हबीबखा यांनी भारतीय स्टेट बँक शंकरपूरच्या शाखेत वार्षिक ३३० रुपये भरून प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना फॉर्म भरला. या योजने अंतर्गत लाभार्थी हा वर्षभरात मृत पावल्यास त्याच्या वारसांना दोन लाख रुपयाचा लाभ मिळतो. योजनेचा फॉर्म भरल्यानंतर वर्षभराच्या आतच हबीबखा पठाण यांचे निधन झाल्याने त्यांच्या वारसदारांना दोन लक्ष रुपये मिळाले. याबाबत हबीबखा यांच्या पत्नी शाहिस्ता यांनी याबाबत समाधान व्यक्त केले.
याविषयी बोलताना भारतीय स्टेट बँक शाखा, शंकरपूरचे बँक मॅनेजर प्रवीण पटले म्हणाले, की सध्याच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकच व्यक्तीने आपल्या उत्पन्नातील अगदी अल्पशा हिस्सा बाजूला काढून विमा काढणे अतीआवश्यक आहे. त्यात प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना चांगला पर्याय आहे.