गडचिरोली - भामरागड तालुक्यातील धान (भात पीक) खरेदी केद्रांमध्ये गोदाम भरल्याने खरेदी बंद करण्यात आली आहे. यामुळे धान विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. गोदामातील धान्याची उचल करून धान खरेदी पुन्हा सुरू करावी, अशी मागणी आता शेतकरी करीत आहेत.
खरेदी केंद्राबाहेर शेतकऱ्यांनी आपले धान्य ठेवले आहे. या धान्याचे रक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना दिवसरात्र जागरण करावे लागत आहे. भामरागडमध्ये मन्नेराजारम, ताडगाव, लाहेरी, कोठी, भामरागड या पाच ठिकाणी धान खरेदी केंद्र आहे. या केंद्रांमधील गोदामे क्षमतेपेक्षा जास्त भरली आहेत. कोठीमध्ये १६५२.४० क्विंटल, भामरागडमध्ये ६६९९.६०, मन्नेराजारममध्ये ५२५०, ताडगावात २८७६ आणि लाहेरीमध्ये ४३०० क्विंटल, असा एकुण २०७७८.४० क्विंटल धान खरेदी करण्यात आले. यातील केवळ ६४०० क्विंटल धानाची उचल करण्यात आल्याने अजुनही १४३७७.४० क्विंटल पीक गोदामात पडून आहे. यामुळे गेल्या ५ ते ६ दिवसांपासून धान खरेदी बंद करण्यात आली आहे.
हेही वाचा - हिंगणघाटची पुनरावृत्ती : लासलगाव बस स्थानकात महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न
पीक लागवडीचा खर्च, उधारी, दैनंदिन खर्च भागवण्यासाठी शेतकऱ्यांना पैशांची गरज आहे. अशातच खरेदी बंद केल्याने त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पाऊस किंवा अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान होत असल्याने केंद्राला तोटा सहन करावा लागत होता. त्यामुळे गोदाम भरल्यावर खुल्या जागेवर पीक खरेदी बंद करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. परिणामी धान चार ते पाच दिवसांपासुन केंद्राबाहेर पडून असून शेतकऱ्यांना रात्रभर थंडीत शेकोटी पेटवून पिकांची राखणदारी करावी लागत आहे.