गडचिरोली - सिरोंचा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कुणाल उंदीरवाडे यांच्या विरोधात सिरोंचा पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांना अश्लील शिवीगाळ करण्यासह धमकी दिल्याच्या आरोपावरून त्यांच्यावर भादंवि 294, 504, 506 कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिरोंचा पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी गटविकास अधिकारी कुणाल उंदीरवाडेच्या विरोधात मंगळवारपासून आंदोलन सुरु केले होते. दरम्यान या आंदोलनाचे स्वरूप बदलून कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरु केले. जोपर्यंत गटविकास अधिकारी उंदिरवाडे यांच्यावर कारवाई होत नाही, तोपर्यंत कामबंद आंदोलन सुरुच ठेवण्याचा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतल्याने मंगळवारपासून संपुर्ण पंचायत समितीचे कामकाज ठप्प पडले.
रजा अर्जावर स्वाक्षरी करण्यासाठी एका लिपिकाला बीडीओ उंदिरवाडे यांनी अश्लील शिवीगाळ केली. त्यामुळे कर्मचारी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला. आज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच पोलिसांनी बीडीओ उंदिरवाडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आता कर्मचारी कोणती भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.