गडचिरोली - महावितरण कंपनीकडून दिवाळीनंतर थकबाकीदार वीजग्राहकांना वीज देयकाचा भरणा करण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली होती. या मोहिमेला गडचिरोली जिल्ह्यातील वीज ग्राहकांकडून व्यापक प्रतिसाद मिळाला आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये गडचिरोली जिल्ह्यातून सुमारे 23 कोटी रुपयांचा भरणा झाल्याची माहिती चंद्रपूर विभागाचे मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांनी दिली आहे.
लॉकडाऊन काळात महावितरण'कडून मीटर वाचन आणि वीज देयकाचे वितरण बंद करण्यात आले होते. जून महिन्यापासून मीटर वाचन आणि वीज बिलाचे वाटप सुरू करण्यात आले. वीज ग्राहकांना तीन ते चार महिन्याचे देयके एकदम आल्याने वीज कंपनीने ग्राहकांना हप्त्याने वीज देयक भरण्याची सोय उपलब्ध करून दिली होती. मात्र वीज ग्राहकांना मोठ्या रकमेचे देयक आल्याने त्यांच्या मनात शंका आल्या. या शंकांचे निराकरण करण्यासाठी प्रत्येक उपविभागात वेबिनार घेण्यात आले. याला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.
47 हजार ग्राहकांकडून ऑनलाईन पद्धतीने वीज बिलाचा भरणा-
गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली विभागातील 33 हजार 194 वीज ग्राहकांनी 3 कोटी 70 लाख रुपयांचा भरणा केला आहे. ब्रह्मपुरी विभागातील 47 हजार 280 ग्राहकांनी 5 कोटी 34 लाख रुपयांचा भरणा केला. तर गडचिरोली विभागातील 60 हजार 651 ग्राहकांनी 7 कोटी 13 लाख रुपयांचा वीज बिलाचा भरणा केला आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये गडचिरोली जिल्ह्यातील तब्बल 47 हजार 188 ग्राहकांनी ऑनलाइन पद्धतीने वीज बिलाचा भरणा केला आहे.
हेही वाचा- चौकशीसाठी 14 दिवसांचा वेळ द्या - प्रताप सरनाईक यांची ईडीकडे मागणी
हेही वाचा- बाबासाहेबांच्या स्मारकाबाबत उत्सुकता - सुप्रिया सुळे; स्मारकाच्या कामाची केली पाहणी