गडचिरोली - जिल्ह्यातील ग्रामसभांसाठी कौशल्य व क्षमता विकासनासंदर्भात कार्यक्रम हाती घेवून गौण वनोपजामधून त्यांच्या क्षमता व मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेण्यास सक्षम करणे या उद्देशाने प्रशासन आणि विविध ग्रामसभांमध्ये सामंजस्य करार होणार आहेत. याची ऐतिहासिक सुरूवात जिल्हाधिकारी कार्यालयात आज लेखा मेंढा या ग्रामसभेपासून झाली.
कार्यक्रमात जिल्हा परिवर्तन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी संजय मीणा व ग्रामसभेकडून देवाजी तोफा यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करून वनाधारीत शाश्वत विकासाच्या नव्या पर्वाला सुरूवात केली. यावेळी वृक्ष मित्र गडचिरोलीचे संयोजक मोहनभाई हिराबाई हिरालाल उपस्थित होते. जिल्ह्याचा सार्वंगीण विकास घडवून आणण्यासाठी व नवीन संकल्पनांना प्रोत्साहित करण्यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिवर्तन समिती एकल केंद्र स्थापन करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सर्वसाधारण आदिवासी जनतेचे जीवनमान उंचविण्यासाठी तसेच आवश्यक रोजगार निर्मिती साठी गौण वनोपज आधारित ग्रामसभेच्या समन्वयातून पुढे जाणारी ही योजना आखण्यात आली आहे. जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्या संकल्पनेतून यामध्ये विविध ग्रामसभांना सामावून जैवविविधता संवर्धन व शाश्वत विकास या संकल्पनांना सोबत घेवून आदिवासींच्या उपजीविकेच्या उन्नतीसाठी गौण वनोपजावरती आधारित हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या सामंजस्य करार करतेवेळी डॉ रुपेन्द्रकुमार गौर, डॉ कुंदन दुफारे, केशवभाऊ गुरनुले, बाजीराव नरोटे, रमेश दुग्गा, सचिन उईके उपस्थित होते.
सामंजस्य कराराच्या उद्दिधष्टांमध्ये कौशल्य विकास, क्षमता विकसन संदर्भात संसधनांचा विकास, परस्पर ज्ञानाची देवाणघेवाण करून दोन्ही पक्षांची क्षमता वाढविण्याचा उद्देश आहे. जिल्हयातील वनसंवर्धन समोर ठेवून शाश्वत विकासातून वनोपजामधील उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी पायाभूत सूविधांची निर्मिती करून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मितीसह कार्यक्षम पुरवठा साखळी तयार केली जाणार आहे. गौण वनोपजाचे विपणन, वितरण आणि वापर यामध्ये कार्यक्षमता वाढविण्यात येणार आहेत. याचबरोबर वनसंवर्धन आणि व्यवस्थापन योजनेचे आराखडे तयार करणे आणि त्यांच्या अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामसभांना सक्षम करण्यात येणार आहे.
ग्रामसभांचा सहभाग महत्त्वाचा
या ऐतिहासिक कामाच्या सुरूवातीला ग्रामसभांचे महत्त्व प्रमुख आहे. प्रशासनाबरोबर काम करताना त्या कच्च्या मालाचे संकलन सुलभ करणारी प्रमुख संस्था म्हणून कार्य करतील. प्रकल्पातील विविध उपक्रम सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी जिल्हा परिवर्तन समितीला ग्रामसभा मदत करतील. स्थानिक स्तरावर जिल्हा परिवर्तन समिती आणि प्रकल्पाशी निगडीत सर्व कार्यांना पाठिंबा देणे आणि मदत करणे ग्रामसभेद्वारे होणार आहे.
"प्रशासन व विविध ग्रामसभांमध्ये वन आधारीत सर्वांगिण विकास साधण्यासाठी सामंजस्य करार केले जाणार आहेत. याची सुरुवात आज लेखा मेंढा या ग्रामसभेपासून आम्ही करत आहोत. या करारामूळे सहभागी ग्रामसभांचे कौशल्य व क्षमता विकासासंदर्भात कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहेत. तसेच गौणवनोपज संदर्भात संकलनापासून, साठवण ते वितरण अशा घटकांबाबत ग्रामसभांना सक्षम करण्यात येणार आहे. हा प्रकल्प लोकसहभागातून पुढे नेण्यात येणार आहे. गोंडवाना विद्यापीठाकडून ग्रामसभा स्तरावरती प्रशिक्षण देण्यासाठी एक मॉडेल तयार करण्यात येत आहे. आज ऐतिहासिक स्वरुपात वन आधारित सर्वांगिण विकासाच्या नव्या पर्वाला सुरुवात होत आहे".
- संजय मीणा (जिल्हाधिकारी, तथा अध्यक्ष जिल्हा परिवर्तन समिती)
"हा निर्णय ऐतिहासिक असून जिल्हा परिवर्तन समितीचे अध्यक्ष आणि लेखा मेंढा ग्रामसभेचे अध्यक्ष यांच्यात सामंजस्य करार झाला. आपल्या गावांचा विकास कोणीही निवडून न देता काम करणाऱ्या ग्रामसभा वनहक्क कायद्याने तयार झाल्या आहेत. गडचिरोली जिल्हा हा देशात सर्वांत जास्त वनहक्क मिळालेला जिलहा आहे. आज झालेल्या करारातून भविष्यात प्रशासन आणि ग्रामसभा मिळून शाश्वत विकासासाठी काम करणार आहेत. याची ऐतिहासिक सुरूवात जगप्रसिद्ध लेखा मेंढातून होत आहे".
- मोहनभाई हिरालाल (वृक्ष मित्र, गडचिरोली)
"आज झालेला सामंजस्य करार हा सामूहिक वनहक्क प्राप्त ग्रामसभांसाठी सर्वसामान्यांसाठी लाभदायक आहे. शासन आणि ग्रामसभा मिळून या प्रकल्पात काम करणार आहे. आज झालेला निर्णय ऐतिहासिक असून याचे आम्ही स्वागत करतो".
- देवाजी तोफा (अध्यक्ष, मेंढा लेखा ग्रामसभा)