गडचिरोली - येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर स्वातंत्र्यदिन उत्साहात पार पडला. या कार्यक्रमादरम्यान शहीद जवानांच्या वीर पत्नींनी उपस्थित पोलीस अधिकारी व पोलीस जवानांना राख्या बांधून रक्षाबंधनाचा उत्सव साजरा केला.
शहीद जवानांची वीर पत्नी हेमलता वाघाडे यांच्या नेतृत्वात रक्षाबंधन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सर्व शहीद जवानांच्या वीर पत्नींनी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक मोहीतकुमार गर्ग, अपर पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल या अधिकाऱ्यांसह उपस्थित सर्व पोलिस जवानांची ओवाळणी करून राख्या बांधल्या. यावेळी पोलीस अधिकारी व जवानांनीही वीर पत्नींना भेटवस्तू दिल्या. पोलीस विभागाने आयोजित केलेल्या रक्षाबंधन कार्यक्रमामुळे वीरपत्नींच्या डोळ्यात आनंदाश्रू दिसत होते.