गडचिरोली - गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने आज गुरुवारी विश्रांती घेतली आहे. त्यामुळे भामरागडमधील पूर ओसरायला सुरुवात झाली आहे. मात्र, येथील शेकडो घर आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्याने अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे.
इंद्रावती, पामुलगौतम, पर्लकोटा नदीला आलेल्या पुराची पाणी पातळी आता काही प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे भामरागड शहरात काही घर व दुकानातील पाणी कमी झाले आहे. मात्र, अजूनही १० ते १५ घरे आणि दुकाने पाण्याखाली आहेत. पुराच्या पाण्याने चिखल मोठ्या प्रमाणात घरात व दुकानात आला असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक दुकानाचे मोठ नुकसान झाले असून शासनाने मदत करावी, अशी मागणी दुकानदार करत आहेत.
छत्तीसगडमधे पावसाने जोर धरला तर पाण्याची पातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे भामरागडवासी चिंतेत आहेत. पुराचा फटका दरवर्षी भामरागडवासीयांना सहन करावा लागत आहे. पार्लकोटा नदीचे पाणी घरांमध्ये शिरत असल्याने येथील अनेकांची पुनर्वसनाची मागणी आहे. मात्र नगरपालिका प्रशासन केवळ नोटीस बजावून मोकळे होत असून पुनर्वसनासाठी जागा उपलब्ध करून देत नसल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.