गडचिरोली : कुरखेडा-देसाईगंज मार्गावरील कसारी फाट्यानजीक कारची झाडाला धडक बसल्यामुळे अपघात झाला. या अपघातात कारमधील प्राध्यापक दाम्पत्याचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली. प्रा. कालिदास श्रीराम टिकले (वय. 57) व प्रा. विद्या कालिदास टिकले-शेट्ये (वय.57, रा. कुरखेडा) अशी मृत दाम्पत्याची नावे आहेत.
हेही वाचा - अतिदुर्गम आदिवासी गाव.. वीज-वाहतुकीची पुरेशी सोय नाही; तरीही कोमल बनली माडिया समाजातील पहिली महिला डॉक्टर
कालिदास टिकले हे पत्नी विद्या यांच्यासह स्वत:च्या कारने खासगी कामाकरता कुरखेड्यावरून देसाईगंजकडे जात होते. कुरखेड्यापासून ११ किलोमीटर अंतरावरील कसारी फाट्याजवळ त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला आदळली. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
हेही वाचा - मुक्तीपथ अभियानातून मार्कंडादेव यात्रा झाली खर्रा व तंबाखूमुक्त
कालिदास टिकले हे कढोली येथील तुकाराम कनिष्ठ महाविद्यालयात, तर विद्या टिकले (शेट्ये) या कुरखेडा येथील शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होत्या. त्यांना एक मुलगा असून तो नागपूर येथे ९वीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. कालिदास टिकले हे ब्रम्हपुरी तालुक्यातील पिंपळगाव (भोसले) येथील मूळ रहिवासी असून, सध्या ते कुरखेडा येथील श्रीरामनगरमध्ये वास्तव्य करत होते. टिकले दाम्पत्याच्या मृत्युमुळे कुरखेडा शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.