गडचिरोली - मतमोजणीला काही तास उरले असून गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार? याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. त्यासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. मतमोजणी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून मतमोजणी केंद्र परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
महाराष्ट्र दिनी कुरखेडा येथे नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून आणला होता. यामध्ये १५ जवानांना वीरमरण आले होते. या घटनेच्या पार्श्वभूमीवर मतमोजणी केंद्र परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. आत जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जात आहे. ओळखपत्राशिवाय कुणालाही आतमध्ये जाण्याची परवानगी दिली जात नाही. नवेगाव कॉम्प्लेक्स येथील कृषी महाविद्यालयात मतमोजणी होणार असून ८४ टेबलवरून २५ फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी होणार आहे. यासाठी ८०१ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सर्वप्रथम पोस्टल मतांची मोजणी होणार असून त्यानंतर ईव्हीएम मतमोजणी होणार आहे. गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ५ उमेदवार रिंगणात असून कोण बाजी मारणार? हे गुरुवारी सायंकाळपर्यंत स्पष्ट होणार आहे.