गडचिरोली- प्रचार तोफा थंडावल्या असून विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचे काउंटडाऊन सुरू झाले आहे. जिल्ह्यातील अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर हेलिकॉप्टरद्वारे पोलिंग पार्ट्या रवाना केल्या जात आहे. वायूसेनेचे ४ आणि जिल्हा पोलीस दलाचा १, असे ५ हेलिकॉप्टर दिमतीला असून निवडणूक निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी तब्बल १५ हजार जवान तैनात राहणार आहेत.
२१ ऑक्टोबरला सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंत गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली, अहेरी, आरमोरी या तीनही विधानसभा क्षेत्रांमध्ये मतदान होणार आहे. तीनही विधानसभा क्षेत्रामध्ये ९३० मतदान केंद्र असून ७ लाख ७४ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. जिल्हा नक्षलग्रस्त असल्याने येथे अतिसंवेदनशील मतदान केंद्रांची संख्या अधिक आहे. त्यामुळे या मतदान केंद्रांवर मोठ्या सुरक्षेच्या गराड्यात पोलिंग पार्ट्यांना पोहोचविले जात आहे.
हेही वाचा- लक्षवेधी लढत : एकीकडे काका-पुतण्या तर दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीच आमने-सामने
वायुसेनेचे ४ हेलिकॉप्टर यापूर्वीच दाखल झाले आहे. हेलिकॉप्टरद्वारे पोलिंग पार्ट्यांना पोहोचविले जात असून सुरक्षेच्या दृष्टीने मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाच्या मतदार जागृती कार्यक्रमामुळे यावेळेसही लोकसभा निवडणुकीप्रमाणे मतदानाची टक्केवारी सर्वाधिक राहील, असा विश्वास जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा- निवडणुकीवर नक्षलवाद्यांचे सावट; गावकऱ्यांनी केली नक्षलवाद्यांच्या बॅनरची होळी