गडचिरोली-जिल्हा परिषदेच्या मालगुजारी तलावाच्या ‘पूनर्बांधणी व बळकटीकरण’ या लेखाशीर्षाखाली असलेल्या युनियन बँकेच्या खात्यातून आरटीजीएसच्या माध्यमातून तब्बल २ कोटी ८६ लाख रुपयांचा अपहार करण्यात आला होता. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आणखी दोन आरोपींना बुधवारी अटक केली. यापूर्वी अटक केलेल्या मुख्य आरोपीकडून सुमारे ६० लाख रुपये किमतीचे १ किलो १६० ग्रॅम सोने जप्त केले आहे.
या प्रकरणाच्या तपासादरम्यान मिळालेल्या माहितीवरुन पोलिसांनी १८ ऑगस्टला नागपुरातील दिघोरी परिसरातील रामकृष्णनगरातील सुधाकर गोपीचंद कांबळे (३८) आणि संजय ज्ञानेश्वर दळवी (४८) रा.जलालपुरा, शारदा चौक, गांधीबाग नागपूर यांना अटक केली. न्यायालयाने त्यांना ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांनी या प्रकरणात सुमारे ६ कोटी रुपयांचा अपहार केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
गडचिरोली जिल्हा परिषदेंतर्गत मालगुजारी तलाव ‘पुनर्बांधणी व बळकटीकरण’ या लेखाशीर्षाखलीअसलेल्या युनियन बँक खात्यातून आरटीजीएसच्या माध्यमातून तब्बल २ कोटी ८६ लाख १३ हजार ८५१ रुपये इतकी रक्कम आरोपींनी काढली होती. ही रक्कम आरोपींनी रामदूत कन्स्ट्रक्शन कंपनी, उत्कर्ष निर्माण कंपनी, पवनसूत कन्स्ट्रक्शन कंपनी इत्यादी कंपन्यांच्या खात्यांमध्ये वर्ग केली होती. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने स्नेहदीप श्रीराम सोनी (४७) रा. नंदनवन, केडीके कॉलेज जवळ नागपूर, किशोरीलाल हिरालाल डहरवाल (५१) रा.रेड्डी, ता. कुरई, जि.शिवणी (मध्यप्रदेश), सुदीप श्रीराम सोनी (५१) रा. नाईक रोड महाल नागपूर, अमित मनोहर अग्निहोत्री (३५), रा.धनगवळीनगर हुडकेश्वर नागपूर, अतुल देविदास डुकरे (४२), रा.प्लॉट क्रमांक ६६ आशीर्वादनगर, नागपूर व विनोद मंगलसिंह प्रधान (४७) रा.करडी, ता. मोहाडी, जि.भंडारा यांना ५ ऑगस्ट रोजी अटक केली होती. न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.
तपासादरम्यान आरोपी स्नेहदीप सोनी याने अपहार केलेल्या रकमेतून मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्या घरुन तसेच बँकेच्या लॉकरमधून १ किलो १६० ग्रॅम सोने जप्त केले आहे. सध्याच्या बाजारभावाप्रमाणे या सोन्याची किंमत ६० लाख रुपये एवढी आहे.