गडचिरोली - जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी गडचिरोली शहरातील आशीर्वादनगरात मोठ्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी गुन्हे शाखेने 1 लाख 29 हजार रुपये रोख व 4 दुचाकी जप्त केल्या. याप्रकरणी ११ जणांवर गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यात शहरातील काही व्यावसायिक, राजकीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
गडचिरोली शहरातील आशीर्वादनगर परिसरातील प्रवीण प्रमोद रक्षमवार यांच्या घरी रात्रीच्या सुमारास जुगार अड्डा सुरू होता. याबाबतची गोपनीय माहिती गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रक्षमवार यांच्या घरी धाड टाकली.
लॉकडाऊनमध्ये चालणारा पत्यांचा डाव पोलिसांनी उधळला याप्रकरणी प्रवीण प्रमोद रक्षमवार (३२), सुभाष समय्या उप्पलवार (२७), मिथुन महेंद्र रणदिवे (३६), अमित प्रदीप इंदूरकर (२८), योगेश महेंद्र रणदिवे (३२), विजय ज्ञाने वागुलकर (३०), रामसरेक विश्राम यादव (३३), अथर्व लक्ष्मण कासर्लावार (२५), दिनेश नामदेव भगत (४५), कपिल गजानन चावके (३२), जगदीश रामचंद्र डोंबळे (३०) या सर्वांवर गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून जुगाऱ्यांना अटक करण्यात आली. कारवाईदरम्यान ५ लाख ३२ हजार ७३५ रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. यावेळी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी जुगाराच्या डावावर लावलेली १६ हजार २१ रुपये रोख रक्कम, डावात वापरण्यासाठी या ११ जणांकडे असलेली एकत्रित १ लाख २९ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम, १ लाख ६० हजार रुपये किंमतीच्या ४ दुचाकी, २ लाख २७ हजार रुपये किंमतीचे १२ मोबाईल संच व ११५ रुपये किंमतीच्या अन्य साहित्याचा समावेश आहे.