गडचिरोली- विसरू कसा विरांनो तुमचा लढा आम्ही! मातृभूमीच्या रक्षणासाठी प्राण त्यागिले तुम्ही या कवितेच्या ओळींच्या माध्यमातून जांभुळखेडा येथील घटनेत हुतात्मा झालेल्या पोलिसांचे स्मरण फलक लावून करण्यात आले. गतवर्षी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी कुरखेडा तालुक्यात जांभुळखेडा परिसरात नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून आणला होता. या स्फोटात जिल्हा पोलीस दलाचे 15 जवान आणि एक वाहनचालक हुतात्मा झाले होते.
जांभुळखेडा घटनेला 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हुतात्म्यांचे स्मरण म्हणून जिल्ह्यात ठिकठिकणी हुतात्मा जवानांचे छायाचित्र असणारे फलक लावले होते. हे फलक रस्त्याने ये- जा करणारा नागरिकांना हुतात्म्यांची आठवण करुन देत त्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.
नक्षल्यांनी जांभूळखेडा रस्त्यावर केल्ल्या भूसुरुंग स्फोटात 15 जिल्हा पोलीस जवानांनी बलिदान दिले त्याला 1 मे महाराष्ट्र दिनादिवशी एक वर्ष पुर्ण झाले. मात्र, कोरोना महामारीमुळे सर्वत्र लॉकडाऊन सुरु आहे. हुतात्म्यांच्या प्रती संवेदना व्यक्त करणारा कार्यक्रम एकत्र होऊन घेणे लॉकडाऊन मूळे शक्य नाही. परंतु, फलकांच्या माध्यमताून हुतात्म्यांचे स्मरण करण्यात आले.