गडचिरोली - जिल्ह्यात अजूनही मुसळधार पाऊस सुरू असल्याने पर्लकोटा नदीला पूर आला आहे. या पुराचे पाणी भामरागडच्या बाजारवाडीत शिरले आहे. त्यामुळे भामरागड आणि तालुक्यातील शंभरहून अधिक गावांचा संपर्क शुक्रवारपासून तुटलेलाच आहे. त्यासोबतच अनेक व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे व्यावसायिक साहित्य हलवण्यासाठी कसरत करीत आहेत.
भामरागडलगत पर्लकोटा नदी आहे. या नदीवर अतिशय ठेंगणा पूल असल्याने भामरागडचा संपर्क दरवर्षीच तुटत असतो. या नदीवर मोठ्या पुलाचे बांधकाम करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे भामरागडसह तालुक्यातील शेकडो गावांना दरवर्षी पावसाळ्यात संपर्क बाहेर राहावे लागते.
यावर्षीही 26 ते 29 जुलैला सतत चार दिवस पावसाने झोडपल्यानंतर एक दिवसाची पावसाने उसंत घेतली होती. मात्र, पुन्हा पावसाने जोर धरल्याने गुरुवारी सकाळी भामरागड-आलपल्लीत मार्गावरील पर्लकोटा नदीसह कुडकेली, कुमरगुडा नाल्याला पूर आला आहे. त्यामुळे दोन दिवसानंतर भामरागड तालुक्याचा संपर्क दुसऱ्यांदा तुटला. तसेच पर्लकोटा नदीचे पाणी भामरागड गावात घुसल्याने शेकडो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
या नदीच्या पुलावरून 10 ते 15 फूट पाणी वाहत आहे. त्याचसोबत घरांमध्येदेखील पाणी शिरले आहे. आज पूर ओसरण्याची कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे आजही भामरागड व तालुक्यातील शंभरहून अधिक गावांना संपर्का बाहेर राहावे लागणार आहे.