गडचिरोली - एरवी क्राइम रेशो अतिशय कमी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात गुरुवारी एकाच दिवशी दोन हत्या घडल्या आहेत. गडचिरोली शहरातील फुले वार्डात राहणारे सामाजिक कार्यकर्ते दुर्योधन रायपुरे यांची अज्ञात इसमाने हत्या केली. तर, अहेरी येथील धर्मपुरी वॉर्डात राहणाऱ्या सासऱ्याची जावयाने हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे गडचिरोली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
गोर-गरिबांची कामे करणे त्यांचा नित्यक्रम
जिल्हा मुख्यालय असलेल्या गडचिरोली शहरातील फुले वाॅर्डात गुरुवारी भल्या सकाळी हत्येची घटना उघडकीस आली. दुर्योधन रायपूरे हे गडचिरोली शहरातील फुले वाॅर्डात वास्तव्यास होते. गोरगरिबांची कामे करणे आणि सामाजिक कार्य करणे हा त्यांचा नित्यक्रम होता. मात्र, आज अचानक सकाळी त्यांचा मृतदेह त्यांच्या घरी आढळून आला. त्यानंतर त्यांची हत्या झाल्याचे उघड झाले. परंतु मारेकरी नेमके कोण, याबाबत अद्याप उलगडा झालेला नाही. गडचिरोली पोलीस याबाबत तपास करीत आहेत.
बंदुकीतून गोळ्या झाडल्या
अहेरी येथील धर्मपुरी वाॅर्डात जावयाने सासऱ्याची गोळी झाडून हत्या केल्याची घटना मध्यरात्री घडली. मारोती मत्तामी (रा. खोरदा, ता. चामोर्शी) असे मृतकाचे नाव आहे. तर, मनोज गावडे असे जावयाचे नाव आहे. जावई मनोज गावडे हे पोलीस दलात कार्यरत आहेत. मुलगी व जावयात कौटुंबिक वाद सुरू होता. त्यामुळे मारोती मत्तामी हे काल (23 जून) रोजी अहेरी येथील मनोज गावडे यांच्या घरी आले होते. रात्री जावई व सासऱ्यात या विषयावरून वाद झाला. दरम्यान, हा वाद विकोपास गेला. रागाच्या भरात मनोजने आपल्याकडे असलेल्या बंदुकीतून गोळ्या झाडल्या. यात सासऱ्याचा जागीच मृत्यू झाला. गोळ्याचा आवाज येताच आजूबाजूचे लोक जागे झाले. त्यानंतर या घटनेची शेजारी असणाऱ्या लोकांनीच अहेरी पोलीस स्टेशनला माहिती दिली. मनोज गावडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.