गडचिरोली- वनसंपदेने नटलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील नक्षल प्रभावित घनदाट जंगलात वसलेला भामरागड तालुका. याच भामरागड तालुक्याला राज्यपालांनी दत्तक घेतले आहे. मात्र, तालुक्यातील शंभरहून अधिक गावांमध्ये जाण्यासाठी धड रस्ता नाही. परिणामी गावात रुग्णवाहिका पोहोचत नसल्याने दुर्दैवाने झोपण्याच्या खाटेलाच रुग्णवाहिका करुन दोन माणसांच्या खांद्यावर रुग्णाला रुग्णालयात पोहचावे लागते. मागील आठ दिवसात तालुक्यात दोन दुर्दैवी घटना घडल्या. यामुळे भामरागड तालुक्यातील आरोग्य सेवेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
8 जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास वेळेवर उपचार न मिळाल्याने जया रवी पोदाडी (वय 23) या चार महिन्याच्या गर्भवती मातेला आपला जीव गमवावा लागला. ती गुंडेनूर येथील रहिवासी होती. त्या गर्भवती महिलेला खाटेवर उचलून नाला ओलांडून एक किमी रुग्णवाहीकेपर्यंत नेण्यासाठी उशीर झाला. त्यामुळे ती उपचारासाठी वेळेवर रुग्णालयात पोहोचू शकली नाही आणि वाटेतच तिचा मृत्यू झाला.
तर 7 जुलै रोजी भामरागड तालुक्यातीलच तुर्रेमरका येथील रोशनी पोदाडी या आदिवासी गर्भवती महिलेला रुग्णालय गाठण्यासाठी तब्बल २३ किलोमीटर पायी प्रवास करावा लागल्याचा धक्कादायक प्रकार घडला. त्या महिलेने हेमलकसा येथील लोकबिरदरी रुग्णालयात एका मुलीला जन्म दिला. मात्र, प्रसुतीनंतरही तिला पायीच जाऊन घर गाठावे लागले. मन हेलावून टाकणाऱ्या या दोन घटना जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचे पितळ उघडे करणारे आहेत.
गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून जवळपास दोनशे किलोमीटरवर भामरागड तालुका आहे. मात्र, विकासाच्या बाबतीत भामरागड तालुका उपेक्षितच राहिला. येथील नागरिकांना पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सर्वाधिक समस्यांना तोंड द्यावे लागते. भामरागड शहरात प्रवेश करण्यापूर्वी पर्लकोटा नदीवरील ठेंगणा पुल पावसाळ्यात वाट अडवितो. यामुळे जवळपास पाच ते सात वेळा तालुक्यातील शंभरहून अधिक गावांचा संपर्क तुटत असतो. या नदीवर उंच पुलाची मागणी कायम धूळखात पडली आहे. तसेच भामरागड-आलापल्ली मार्गावरील तुमरगुडा नाल्यावरील पुलही दुर्लक्षित आहे. तर भामरागड पलीकडच्या अनेक गावांमध्ये जाण्यासाठी नाल्यावर पूल तर दूरच साधा कच्चा रस्ताही नाही. पायवाटेने आणि नाल्यातील पाण्यातूनच येथील नागरिक तालुका मुख्यालय गाठतात.
भामरागड तालुक्यात 128 गावे आहेत. मात्र, केवळ लाहेरी, नारगुंडा, मन्नेराजाराम या तीन ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र तर भामरागड तालुका मुख्यालयी ग्रामीण रुग्णालय आहे. मात्र, या रुग्णालयात गोळी देण्यापलीकडे इतर कोणत्याही सुविधा नाही. हेमलकसा येथे असलेल्या लोकबिरादरी रुग्णालयात शेकडो रुग्णांवर उपचार होतात. मात्र, येथे पोहोचण्याआधीच अनेकांना जीव गमवावा लागतो. तालुक्यात लोकप्रतिनिधी-शासकीय अधिकारी, कर्मचारी आहेत. मात्र, गावात नियुक्ती असलेले अनेक अधिकारी-कर्मचारी तालुका मुख्यालय भामरागड किंवा आलापल्ली येथूनच कामकाज चालवतात. मात्र, अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई होत नाही. त्यातच नक्षलवाद्यांची दहशत मग तक्रार करायची तर कुणाकडे? लोकप्रतिनिधी कोण हेही माहिती नसणारे बिचारे आदिवासी निमुटपणे सहन करतात.
शासनाकडून आदिवासींच्या विकासासाठी करोडो रुपयांचा निधी येतो. मात्र, विकास शून्य. नक्षलवाद्यांच्या दहशतीमुळे रस्ते, पुलांचे काम करण्यास कंत्राटदार तयार नसतात. काम सुरू झालेही तर नक्षलवादी वाहन, साहित्याची जाळपोळ करुन काम बंद पाडतात. मग कसे होणार विकास कामे, हाही प्रश्नच. त्यामुळे खुद्द भामरागड तालुकवासीय नागरिकच 'न संपणाऱ्या आमच्या नरकयातना' म्हणत जीवन जगत आहेत.