गडचिरोली - राज्यात नक्षल प्रभावित मतदारसंघ असलेल्या गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात पहिल्या टप्प्यात ११ एप्रिलला मतदान होत आहे. मात्र, या निवडणुकीवर नक्षल्यांचे सावट असून निवडणुकीवर बहिष्कार घालण्याची धमकी नक्षलवाद्यांनी ठिकठिकाणी फलक लावून दिली आहे. त्यामुळे लोकशाहीच्या 'बॅलेट'ला नक्षल्यांच्या 'बुलेट'चे आव्हान आहे. त्यामुळे या निवडणुका शांतपणे पार पाडण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान असणार आहे.
यापूर्वीच्या निवडणुकांचा आढावा घेतल्यास पोलिंग पार्टीवर हल्ला, मतदान केंद्रावर गोळीबार, पोलीस जवानांवर गोळीबार, अशा अनेक घटना निवडणूक काळात घडल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकीतही नक्षल कारवायांचे संकट कायम आहे. निवडणूक जाहीर होताच नक्षल्यांनी अनेक ठिकाणी कापडी फलक लावून व पत्रके लावून निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे नागरिकांना आव्हान केले आहे. ४ दिवसांपूर्वी निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना जिल्ह्याच्या पूर्वोतर भागात निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे फलक लावून दहशत निर्माण करण्याचा नक्षलवाद्यांनी प्रयत्न केला आहे.
कोरची तालुक्यातील मसेली, धानोरा तालुक्यातील देवसूर व भामरागड तालुक्यातील काही गावांलगत असे फलक आढळून आले आहेत. या फलकांवर नक्षल्यांनी भाजपवर टीका करत, भाजप हा लोकविरोधी तसेच, दलित, आदिवासी, मुस्लिम व महिलांवर अन्याय करणारा पक्ष आहे. त्यामुळे या पक्षास हद्दपार करा, असे आवाहन फलकांद्वारे करण्यात आले आहे. नक्षल्यांच्या बॅनरबाजीनंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून जिल्ह्यात यापूर्वीच स्पेशल फोर्स दाखल झाली आहे.
दुर्गम भागातील मतदान केंद्रावर पोलिंग पार्टी पोहोचवण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेतली जाणार आहे. गडचिरोली पोलीस दलाकडे याआधीच १ हेलिकॉप्टर आहे. निवडणूक काळात आणखी १ हेलिकॉप्टर जिल्हा मुख्यालयात दिमतीला राहणार असून दोन्ही हेलिकॉप्टरच्या मदतीने पोलिंग पार्टी पोहोचवणे व सुरक्षितरित्या परत आणले जाणार आहेत. मतदान काळात पोलीस दल, सी-६० जवान, सीआरपीएफ, बीएसएफ, आदी फोर्स तैनात राहणार आहेत. गडचिरोली जिल्ह्यात नेहमीच नक्षल कारवाया घडत असतात. त्यामुळे राज्यासह देशाचे लक्ष येथील मतदानाकडे लागले आहे.