गडचिरोली - महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना अध्यापन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी वर्ष २०२१ चा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. ५ सप्टेंबर २०२१ रोजी शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीद्वारे जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरित होणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील आसरअली येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक खुर्शिद शेख यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.
कोरोना पार्श्वभूमीवर ऑनलाईन पुरस्कार -
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नुकतेच वर्ष २०२१ च्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांची घोषणा केली आहे. देशातील एकूण ४४ शिक्षकांना हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला असून खुर्शिद शेख आणि उमेश खोसे या दोन शिक्षकांचा यात समावेश आहे. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर येत्या ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त दूरदृष्य प्रणालीद्वारे राष्ट्रपतींच्या हस्ते गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत खुर्शिद शेख यांना तर उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात उमेश खोसे यांना पुरस्कार वितरित करण्यात येणार आहे.
खुर्शीद शेख यांची शिक्षण क्षेत्रात वेगळीच ओळख -
गडचिरोली जिल्ह्यातील आसरअली येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व उपक्रमशील शिक्षक म्हणून खुर्शीद शेख यांची शिक्षण क्षेत्रात वेगळीच ओळख आहे. त्यांनी शिक्षणातील नवनवीन उपक्रमांचा अवलंबन करून आपल्या शाळेत महत्त्वपूर्ण बदल घडविले आहे. विद्यार्थ्यांना सर्वांगीन शिक्षण देण्यासाठी शाळेत आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मूल्याधारित शिक्षणावर भर देऊन विद्यार्थ्यांना संवेदनशील, वक्तशीर व जबाबदार बनविण्याकरीता त्यांनी शैक्षणिक उपक्रम राबविले. विविध शैक्षणिक उपक्रमांद्वारे त्यांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग घडवून आणला आहे.
हेही वाचा - यंदाही गणेशोत्सव साधेपणानेच साजरा करावा लागणार, 10 कार्यकर्त्यांसह पालिका कर्मचारी करणार मूर्तीचे विसर्जन