गडचिरोली : बुधवारी सकाळच्या सुमारास कोरची तालुक्यातील कोडगुल निवासी जिवता रामटेके या 45 वर्षाच्या नागरिकाची पोलीस खबरी असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी गोळी झाडून हत्या केली. खरे तर रामटेके यांचा पोलिसांशी साधा संबंधही आलेला नाही. मागील काही घटना बघितल्यास कोणाचीही हत्या करतांना पोलिसाचे खबरी असल्याचे आरोप लावणे नक्षलवाद्यांची एक प्रकारे फॅशनच झाली आहे, असा आरोप भूमकाल संघटनेने केला आहे.
संघटनेने म्हटले आहे की, मागील काही काळात गडचिरोली पोलिस विभागावर नक्षलवादी भारी पडल्याचे दिसून येते. कधी पुराडा सारख्या पोलिस स्टेशनवर भर दिवसा हल्ला तर कधी कोडगुल पोलिस स्टेशन समोर बॉम्ब स्फोटामध्ये पोलिस शिपाई मारला जातो. मागील वर्षात युगेंद्र मेश्राम या शिक्षकाची नाहक हत्या करून चुकीने केलेल्या हत्येसाठी माफी मागायचे नाटक नक्षलवाद्यांनी केले होते. मागच्याच आठवड्यात या भागात उपसरपंच याची हत्या केली आणि आत्ता लगेच नाहक जीवता रामटेके या दलित समाजाच्या गरीब व्यक्तीला ठार केले.
गावकऱ्यांची चौकशी केल्यानंतर मागील वर्षी रामटेके यांना नक्षल धमकीचे पत्र आले. पत्र बारकाईने बघता कुणी तरी नक्षल्यांच्या नावाने स्वतःच पत्र टाकल्याचे दिसून येते. आपसी वादातून एखाद्याने असे पत्र नक्षलवाद्यांच्या नावाने काढले तर नाही, अशी शंका येते. कुटुंबाच्या म्हणण्याप्रमाणे या हत्येमागे त्याचाच हात असल्याची शंका व्यक्त होत आहे आणि अशा काही नक्षलसमर्थकां विरूद्ध कारवाईची मागणी भूमकाल संघटनेचे अध्यक्ष डॉ. अरविंद सोहनी, सचिव डॉ. श्रीकांत भोवते, प्रा. प्रशांत विघे आदींनी केली आहे.