गडचिरोली - सिरोंचा तालुक्याच्या सीमेवरील गोदावरी नदीवर तेलंगणा सरकारने बांधलेल्या मेडीगट्टा धरणाचे दरवाजे त्वरित उघडावे. अन्यथा, तीव्र आंदोलन करण्याचा इशारा माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार धर्मराव आत्राम यांनी दिला आहे. सद्यस्थितीत मेडीगट्टा धरणाचे दरवाजे बंद करण्यात आल्याने बॅकवाटर सिरोंचा तालुक्यातील शेकडो हेक्टर शेतीमध्ये शिरल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
मेडीगट्टा प्रकल्पाला सुरुवातीपासूनच विरोध
सिरोंचा तालुक्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या गोदावरी नदीवर तेलंगणा सरकारने बांधलेल्या मेडीगट्टा प्रकल्पाला सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांचा सुरुवातीपासूनच विरोध होता. मात्र, तेलंगणा सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधानंतरही या महाकाय प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण केले. या प्रकल्पाचे पाणी अडविण्यात आल्याने सिरोंचा तालुक्यातील 40 ते 50 गावातील शेती सध्या पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे ह्या प्रकल्पाच्या बांधकाम पासूनच सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांचा विरोध होता.
हेही वाचा - कृषी सिंचन घोटाळा पहिल्या टप्प्यात 96 घोटाळ्यांमध्ये 94 लाखांची शासनाची फसवणूक उघड
गतवर्षीही धर्मराव आत्राम यांनी दिला होता आंदोलनाचा इशारा
मेडीगट्टा प्रकल्पाचे काम गेल्या वर्षी पूर्ण झाले. त्या वेळी शेतकऱ्यांना कोणताही मोबदला मिळाला नव्हता. तेव्हा अहेरीचे आमदार धर्मराव आत्राम यांनी प्रकल्पाला भेट देऊन येथील शेतकऱ्यांशी चर्चा केली. तेव्हा अनेकांना मोबदला न मिळाल्याची तक्रार स्थानिक शेतकऱ्यांनी केली होती. आमदार आत्राम यांनी तेलंगणा सरकारविरुद्ध आवाज उठवून शेतकऱ्यांना मोबदला न दिल्यास प्रकल्पस्थळी जलसमाधी घेण्याचा इशारा दिला होता. तेव्हा तेलंगणा सरकार खडबडून जागे झाले आणि शेतकऱ्यांना मोबदला मिळाला होता.
बॅक वॉटरमुळे खरीप व रब्बी पिकांचे नुकसान
सद्यस्थितीत प्रकल्पाचे पाणी अडविण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात बॅकवॉटर मागे फेकले गेले आहे. परिणामी सिरोंचा तालुक्यातील 40 ते 50 गावांतील शेती पाण्याखाली गेली आहे. या प्रकल्पाच्या पाण्यामुळे खरीप तर सोडाच, रब्बीचे पीकही घेता येत नसल्याने सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मोठ्या या नुकसानीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळेच या प्रकल्पाचे दरवाजे उघडण्याची मागणी धर्मराव आत्राम यांनी केली आहे.
हेही वाचा - पोलीस उपनिरीक्षकांनी केलेल्या रक्तदानामुळे वाचले अपघातग्रस्ताचे प्राण, गृहमंत्र्यांकडूनही कौतुकाची थाप