गडचिरोली - तेंदुपाने तोडण्यासाठी जंगलात गेलेल्या मजुरावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना शनिवारी दुपारच्या सुमारास आरमोरी तालुक्यातील कोंढाळा जंगलात घडली. अभिमन झीलपे (वय 55 वर्षे, रा. कोंढाळा) असे मृत मजुराचे नाव आहे.
देसाईगंज वनविभागातर्फे तेंदूपत्ता संकलन सुरू झाले आहे. त्यामुळे शेकडो मजूर तेंदूपाने तोडण्यासाठी जंगलात जातात. शनिवारी सकाळी अभिमान झिलपे कोंढाळा जंगलातील पाच पांडव परिसरालगत पाने तोडण्यासाठी गेले होते. तेव्हा दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला करून ठार केले. दुपारी घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी-कर्मचारी घटनास्थळी पोहोचले.
तत्पूर्वी शुक्रवारीही तेंदुपत्ता संकलनासाठी रवी, अरसोडा जंगल परिसरातील जंगलात गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून तिला जखमी केले होते. तर महिनाभरापूर्वी याच जंगलात वाघाने आरमोरी येथील एका व्यक्तवर हल्ला करून ठार केले होते. त्यामुळे वनविभागाने वाघांचा वावर असलेल्या क्षेत्रात वनकर्मचाऱ्यांसोबत गावातील काही युवकांची मदत घेऊन पहाराही दिला होता. महिनाभरातील ही तिसरी घटना असून मजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
हेही वाचा - पोलिसांनी श्रमदानातून केले तलावाचे खोलीकरण; अतिदुर्गम परसलगोंदीवासी ग्रामस्थांचा पाणी प्रश्न सुटणार