गडचिरोली - विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा येथील पुरातन हेमाडपंती मंदिरात आज महाशिवरात्री निमित्त 'हर हर महादेव'चा गजर ऐकायला मिळाला. 15 दिवस भरणारी यात्रा कोरोनामुळे गेली दोन वर्षे भरली नाही. यावर्षी यात्रेला परवानगी मिळाली. मात्र, ऐन एक दिवस अगोदर जिल्हाधिकारी यांनी यात्रा रद्दचे आदेश काढले. यामुळे भाविकांचा हिरमोड झाला असला तरी, 'हर हर महादेव'चा गजर करीत दर्शनासाठी मात्र मोठी गर्दी आज दिसून आली.
उत्तरवाहिनी वैनगंगा नदीमुळे विशेष महत्त्व -
चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा येथे प्रसिद्ध पुरातन हेमाडपंती मंदिर आहे. विशेष म्हणजे, वैनगंगा नदी तिरावर हे मंदिर वसलेले असून दक्षिणवाहिनी वैनगंगा नदी मार्कंडेश्वर मंदिरापासून उत्तरवाहिनी झाली आहे. त्यामुळे, या मंदिराला विशेष महत्त्व आहे. महाशिवरात्रीनिमित्त जवळपास पंधरा दिवस येथे मोठी यात्रा भरत असते. यात्रेदरम्यान लहान-मोठ्या दुकानांसह अनेक मनोरंजनाची साधने येथे लावली जातात. त्यामुळे, या यात्रेदरम्यान करोडो रुपयांची उलाढाल होत असते. मात्र, गेली दोन वर्षे कोरोनामुळे यात्रा भरलीच नाही. यावर्षी यात्रा भरवण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र ऐन वेळेवर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व यात्रा रद्द केल्या.
महापूजेनंतर दर्शनासाठी रांगा -
मंदिरात 50 भाविकांना दर्शनासाठी प्रवेश दिला जात असून, चामोर्शी पोलिसांकडून मंदिर परिसरात मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे. नदीत अनेक भाविक पवित्र स्नान करतात, त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून येथे बोटींची व्यवस्था करण्यात आली आहे. आज सकाळी मंदिराचे ट्रस्टी पंकज पांडे आणि गडचिरोली विधानसभेचे आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा झाली. त्यानंतर भाविकांसाठी दर्शन सुरू करण्यात आले. सद्यस्थितीत मनोरंजनाची किंवा इतर कोणतीही दुकाने लागली नसली तरी, दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी दिसून येत असून, हरहर महादेवचा गजर येथे गुंजत आहे.
हेही वाचा - नक्षलवाद्यांना स्फोटक साहित्य पुरवणाऱ्या चौघांना गडचिरोली पोलिसांकडून अटक