गडचिरोली - सामान्य माणसाचा अधिकार- 'माझे आधार,माझी ओळख' म्हणून आधार कार्डला आज विशेष महत्त्व आहे. कोणत्याही शासकीय कामासाठी आधार हे महत्त्वपूर्ण दस्तावेज मानले जाते. मात्र भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम लाहेरी भागात आदिवासींना आधार कार्ड म्हणजे काय, हेच माहीत नव्हतं. अखेर पोलिसांनी पुढाकार घेऊन 'माझे पोलीस, माझे आधार' उपक्रमाला सुरुवात केली. अनेक गावांमध्ये शिबीरं घेऊन शेकडो आदिवासींना आधार कार्ड बनवून दिले. या उपक्रमाने नक्षलग्रस्त भागातील आदिवासींना दिलासा मिळाला असून त्यांना सरकारी योजनांचा लाभ घेण्यास मदत होणार आहे.
आदिवासींमध्ये साक्षरतेचा अभाव
गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड हा अतिदुर्गम व नक्षलग्रस्त तालुका. येथील आदिवासींचा शहराशी फारसा संबंध येत नाही. त्यामुळे तालुक्यातील शेकडो कुटुंब शहराशी अनभिज्ञच. तालुक्यातील अनेक गावांमध्ये जाण्यासाठी धड रस्ता नाही. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक दिवस येथील नागरिकांचा जगाशी संपर्क तुटलेला असतो. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांपर्यंत शासकीय योजना पोहोचत नाही. तर येथील नागरिकही निरक्षर असल्याने ते स्वतःहून शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढे येत नाही. त्यामुळे प्रशासनाकडून कोणत्याही योजनांचा लाभ देण्यासाठी येथील नागरिकांना आधार कार्ड मागितल्यास अनेकांकडे आधार कार्ड नसल्याचे समोर आले आहे.
236 नागरिकांना मिळाला आधार
पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी अविनाश नळेगावकर यांनी गावात आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती शिबीर घेण्याचे ठरवले आणि त्यांना साथ मिळाली महसूल विभागाची. कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलीस दलातर्फे लाहेरी येथे तीन दिवस 'माझे पोलीस, माझे आधार' शिबीर पार पडले. या शिबिरात फोदेवाडा, धिरंगी, मोरडपार, कुव्वाकोडी, गोपणार, तुरेमर्का, बंगाळी, कोयर, भुसेवाडा, मुरंगल, गुंडेनूर, होडरी, लष्कर, कुकामेटा, मल्लम्पोदूर, लाहेरी आदी गावातील अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्ध अशा सर्व वयोगटातील महिला-पुरुषांनी नोंदणी केली. यात 236 नागरिकांना आधार कार्ड काढून देण्यात आले.
इतर गावातही शिबिराचे आयोजन - तहसीलदार कांबळे
भामरागडचे तहसीलदार अनमोल कांबळे, सीआरपीएफचे असिस्टंट कंमांडन्ट संतोष भोसले, आधार सेवा केंद्र संचालक महेंद्र कोठारे, दशरथ मडावी यांनी तीन दिवस गावात हजर राहून सेवा दिली. भामरागड तालुक्यातील सर्वाना आधार उपलब्ध व्हावे, यासाठी मन्नेराजारम, ताडगाव, कोठी, कीयर या गावातही अशाच शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार अनमोल कांबळे यांनी दिली. पोलीस दलाच्या पुढाकाराने 'माझे पोलीस, माझे आधार' अंतर्गत आधार नोंदणी/दुरुस्ती शिबीर आदिवासीबहुल अतिदुर्गम, अशा भामरागड तालुक्यासाठी पथदर्शी ठरावे असेच राहिले.