गडचिरोली - देसाईगंज पालिकेचे माजी नगराध्यक्ष आणि भाजपचे ज्येष्ठ नेते किशन नागदेवे यांची पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. बुधवारी संस्कृती सभागृहात आयोजित कार्यक्रमात त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
त्यांनी देसाईगंज नगरपरिषदेचे अध्यक्ष म्हणून यशस्वीरीत्या काम केलेले आहे. २०१० ते २०१६ या कालावधीसाठी ते भाजपचे जिल्हाध्यक्ष होते. त्यानंतर खासदार अशोक नेते यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आली. खासदार नेते यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १६ सप्टेंबर २०१९ ला नागदेवे यांना तात्पुरते जिल्हाध्यक्षपद बहाल करण्यात आले होते.
हेही वाचा - कृत्रिम बहुमताच्या जोरावर सत्ताधारी लोकशाहीचा खून पाडतायत'
भाजप जिल्हाध्यक्ष पदासाठी किशन नागदेवे, बाबूराव कोहळे, प्रमोद पिपरे आणि रमेश भुरसे या चार जणांनी मुलाखत दिली होती. त्यानंतर संघटनमंत्र्यांनी ही चार नावे प्रदेश कार्यकारिणीकडे पाठवली. प्रदेश कार्यकारिणीने हिरवा झेंडा दाखवल्यानंतर झालेल्या बैठकीत किशन नागदेवे यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली.
भाजपचे विदर्भ प्रदेश संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, पक्षाचे सरचिटणीस आमदार डॉ. रामदास आंबटकर, खासदार अशोक नेते, आमदार अनिल सोले, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, ज्येष्ठ नेते प्रकाश सावकार पोरेड्डीवार, बाबूराव कोहळे, प्रमोद पिपरे, रवींद्र ओल्लालवार, डॉ.भारत खटी यांच्या उपस्थितीत गडचिरोली भाजपची बैठक आयोजित करण्यात आली होती.