गडचिरोली - जिल्ह्यात आजपर्यंत सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्याने अनेक तलाव तुडूंब भरले आहेत. चामोर्शी तालुक्यातील रेगडी येथील कन्नमवार जलाशय शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे या ठिकाणी वेस्टवेअरवरून पाणी ओसंडून वाहत आहे. त्यामुळे येथे पर्यटकांची मोठी गर्दी दिसून येत आहे.
हेही वाचा - गडचिरोलीत मुसळधार पाऊस; अनेक मार्ग बंद
जिल्ह्यात कोणतेही मोठे सिंचन प्रकल्प नाही. मात्र, चामोर्शी तालुक्यातील रेगडी येथे असलेल्या कन्नमवार जलाशयामुळे चामोर्शी तालुक्यातील शेकडो हेक्टर शेती सिंचनाखाली आली आहे. हा तलाव पूर्ण भरल्यास तालुक्यातील शेतकऱ्यांना हमखास पिके होण्याची आशा असते. यावर्षी हा तलाव शंभर टक्के भरला आहे. त्यामुळे वेस्टवेअरवरून वाहणारे पाणी बघण्यासाठी पर्यटकांची एकच गर्दी बघायला मिळत आहे.
हेही वाचा - गडचिरोली पोलीस दलाच्या पुढाकाराने आश्रम शाळांच्या 21 हजार विद्यार्थ्यांनी दिली स्पर्धा परीक्षा
घोट वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत जलाशयाच्या ठिकाणी सौंदर्यीकरणाचे काम सुरू असून बालगोपाळांसाठी मौजमस्ती आणि पर्यटकांसाठी योग्य व्यवस्था करण्याचे काम मागील वर्षापासून सुरू आहे. त्यामुळे पावसाळ्यातच नव्हे तर वर्षभरच या ठिकाणी पर्यटकांची गर्दी असते. सुट्टीच्या दिवशी शाळकरी विद्यार्थी आणि गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटक या ठिकाणी गर्दी करतात. सुट्टीच्या दिवसात या ठिकाणी पर्यटकांची एकच गर्दी पाहायला मिळते.