गडचिरोली - कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 22 मार्चला 'जनता कर्फ्यू'चे आवाहन केले होते. या आवाहनाला साथ देत गडचिरोलीकरांनी यशस्वीपणे कर्फ्यु पाडला.
पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सायंकाळी 5 वाजता कर्फ्यूदरम्यान अनेक नागरिकांनी घराबाहेर पडून थाळ्या आणि टाळ्या वाजवून गजर केला. या माध्यमातून कोरोनाशी लढणाऱ्या आणि कोरोनाग्रस्तांची सेवा करणाऱ्या आरोग्य विभागातील अधिकारी- कर्मचाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कर्फ्यूदरम्यान काही ठिकाणी नागरिकांना पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागले. मात्र, ही कारवाई थोड्या वेळातच पूर्ण करून नागरिकांना घरी पाठवण्यात आले.
गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौक आणि आठवडी बाजारात आज दिवसभर शुकशुकाट होता. जिल्ह्यातील अल्लापल्ली, अहेरी, चामोर्शी, आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा या मोठ्या शहरांमध्येही कडकडीत कर्फ्यु पाळण्यात आला. पुढील काही दिवस धोक्याचे असून नागरिकांनी अशाच प्रकारे प्रशासनाला साथ देऊन जागृत राहावे, घाबरू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे.
हेही वाचा - हातावर क्वारंटाइनचा शिक्का.. कोरोना संशयिताला रेल्वेतून खाली उतरवले
हेही वाचा - कोरोनाचा हायव्होल्टेज इफेक्ट, वीजबिल आकारणी पद्धत बदलणार