गडचिरोली - गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. देवराव होळी व स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांच्या विकास कामांच्याबाबत उदासीन भूमिकेमुळे आपण बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला आहे. भाजप पक्षाने आपल्यावर कोणतीही कारवाई केली, तरी आपण मागे हटणार नाही. तर आपल्यामागे जनआशीर्वाद असून आपणच निवडून येणार, असा विश्वास गडचिरोली विधानसभेचे अपक्ष उमेदवार गुलाबराव मडावी यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केला.
हेही वाचा - ...अन् धो-धो पावसातही मतदार डोक्यावर खुर्ची घेऊन ऐकत होते भाषण
गुलाबराव मडावी हे भाजप पक्षाचे गडचिरोली नगर परिषदेत नगरसेवक आहेत. मात्र, त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. त्यांनी अर्ज परत न घेतल्याने भाजप पक्षाकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे यांनी दिली आहे. याबाबत बोलताना मडावी म्हणाले, नगरपरिषदेतील अनेक प्रश्न स्थानिक आमदाराकडे आपण मांडले. मात्र, त्यांच्या उदासीन भूमिकेमुळे नगरपरिषदेला विकास कामे करता आली नाहीत. त्यामुळे तळमळ असतानाही मी माझ्या प्रभागाचा विकास करू शकलो नाही, ही खंत आहे. त्यामुळेच आपण अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली आहे.