गडचिरोली -वनविभागांतर्गत येणाऱ्याचातगाव परिक्षेत्रात शिवणी येथे ३१ जानेवारी रोजी गिधाड पक्षी आजारी अवस्थेत असल्याची माहिती पोलीस पाटलाकडून वनविभागाला मिळाली. माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी व गिधाड मित्रांनी घटनास्थळी धाव घेवून आजारी गिधाडाला ताब्यात घेतले. त्या गिधाडावर उपचार करून सोमवारी गडचिरोलीचे मुख्य वनसंरक्षक एटबॉन यांच्या हस्ते गिधाडाला निसर्गात मुक्त करण्यात आले.
जखमी गिधाड पक्षी हिमालयन ग्रीफ या प्रजातीचा असून तो स्थलांतरित आहे. थंडीच्या दिवसात हिमालयातून गडचिरोली येथील वनपरिक्षेत्रात तो दाखल झाला आहे. मात्र, तो जखमी अवस्थेत आढळून आला. गडचिरोली वनविभागाकडून गिधाड संरक्षणासाठी 'भरारी' उपक्रम राबविण्यात येत आहे.या जखमी गिधाडावर उपचार झाले. त्यामुळे त्याने निसर्गात पुन्हा उंच भरारी घेतली. हा पक्षी उन्हाळा लागताच पुन्हा थंड प्रदेशात म्हणजेच हिमालयाशेजारील देशात जातो.
जिल्हा स्टेडियम येथे आयोजित या कार्यक्रमाला सहाय्यक वनसंरक्षक सोनल भडके, वनविभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच शेकडोच्या संख्येत शालेय विद्यार्थी उपस्थित होते. शालेय विद्यार्थ्यांना गिधाड हा पक्षी निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी किती महत्वाचा आहे, याबाबत प्रोजेक्टरव्दारे माहिती देण्यात आली. गिधाड प्रजाती दिवसेंदिवस नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे त्याचे संगोपन करण्याची गरज आहे, असे सांगत यावेळी विद्यार्थ्यांना गिधाड संरक्षणाबाबतचा संदेश देण्यात आला. यावेळी गडचिरोलीतील नागरिक, वनपरिक्षेत्र गडचिरोली येथील सर्व कर्मचारी उपस्थित होते.