गडचिरोली - राज्याच्या विधानसभा निवडणुकींचा प्रचार थांबला असला तरी जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातल्या मतदारांना मात्र राज्यात निवडणुका सुरू असल्याचेच माहित नाही. हे धक्कादायक चित्र आहे गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी या विधानसभा मतदारसंघातील. तसेच लोक म्हणत होते की, इकडं कुणी उमेदवार प्रचारालासुद्धा फिरकला नाही. त्यामुळे आम्हाला निवडणुका आहेत हे देखील माहित नाही.
हेही वाचा - वरळी मतदारसंघात चार कोटींची संशयास्पद रक्कम जप्त
ज्यावेळी महसूल कर्मचारी मतदारांना मतदार स्लीप देण्यासाठी गेले असता, त्यांना २१ ऑक्टोबरला मतदान आहे असं कळालं! कुठला उमेदवार निवडणुकीला उभा राहिला आहे हेही येथील लोकांना माहिती नाही. कर्मचाऱ्यांच्या सांगण्यावरुन लोकांनी आता ठरवलं आहे की, आम्ही मतदान करणारचं आहोत. मात्र, या भागात विकास पोहचला नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे. रस्ते, पाणी आणि सरकारच्या विविध योजना आम्हाला मिळाल्या नसल्याचे लोक म्हणत आहेत.
भामरागड तालुक्यातील आदिवासी प्रचाराच्या धडाक्यापासून अनभिज्ञच राहिले आहेत. प्रचारासाठी कोणी नेतेमंडळी गावात येतील तर त्यांना रस्त्याच्या समस्येबद्दल जाब विचारू, असे येथील लोक म्हणत होते. मात्र नक्षलग्रस्त व अतिदुर्गम भाग असल्याने तालुक्यातील शेकडो गावांमध्ये उमेदवार फिरकलेच नाही. मात्र मतदान करा म्हणून प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. त्यामुळे 21 ऑक्टोबरला मतदान करायचे आहे, हे येथील आदिवासींना उशीरा माहिती झाले.
निवडणूक कधी आहे, किती वाजेपर्यंत मतदान चालणार, याबाबतची मतदान पावती पोहोचवण्यासाठी महसूल कर्मचाऱ्यांनी गावोगावी भेटी दिली. जवळपास सर्वच गावातील नागरिकांना मतदानाच्या पावत्या मिळाल्या आहेत. तालुक्यातील बीनागुंडा, नेलगुंडा, वीसामुंडी, खंडीनैनवाडी, पोयरकोठी, गुंडरुवाही, मोरमबुसी, आलदंडी, होड्री ही गावे अतिसंवेदनशील आहेत. या गावमधे ये-जा करण्यासाठी कच्चा रस्ताही नाही. त्यामुळे निवडणूक काळात या भागात पोहचण्यासाठी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
हेही वाचा - पाकिस्तानच्या गोळीबारात 2 जवान हुतात्मा; प्रतिहल्ल्यात निलम खोऱ्यात ४ जणांचा खात्मा